गणेशोत्सवावेळी मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची गर्दी फार वाढली जाते. अशातच कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या कोलाड आणि अंजनी रेल्वे स्थानकांचा थांबा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
गणेशोत्सव आणि कोकण यांचं अतूट नातं पुन्हा दृढ होत आहे. कोकणातल्या गणपतीला गावी जाण्यासाठी झटणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली दोन महत्त्वाची रेल्वे स्थानकं कोलाड आणि अंजनी आता पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवा-सावंतवाडी-दिवा गाडीला पुन्हा एकदा या दोन स्थानकांवर थांबा मिळणार आहे. सोमवार, २८ जुलैपासून हे थांबे पुन्हा सुरू होतील.
कोरोना काळात कोलाड आणि अंजनी स्थानकांवरील थांबा बंद झाल्याने शेकडो प्रवाशांना, विद्यार्थ्यांना, कामगारांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत होतं. ही स्थानकं प्रवाशांसाठी केवळ थांबे नव्हते, तर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होती. त्यामुळे स्थानिकांनी सातत्याने या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता.
कोलाड आणि अंजनी या ठिकाणी फक्त प्रवाशांनाच नव्हे तर शेतीमालाचा वाहतूक प्रवास, व्यापारी व्यवहार, आणि गावी जाणं-येणं या गोष्टीही ट्रेनवर अवलंबून आहेत. एसटी सेवा आजही अनेक गावांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे रेल्वेचं महत्त्व अधिकच वाढलं आहे.
स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी आणि विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, “हा फक्त एक थांबा नसून प्रवाशांच्या हक्काचा विजय आहे.” गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा पुन्हा मिळणं म्हणजे 'बाप्पानं साकडं ऐकलं' असंच म्हणावं लागेल!


