- Home
- Mumbai
- Mumbai Rain : 1000 मुंबईकरांना मिळाली होती जलसमाधी, 26 july 2005 च्या जलप्रलयाला 20 वर्षे पूर्ण
Mumbai Rain : 1000 मुंबईकरांना मिळाली होती जलसमाधी, 26 july 2005 च्या जलप्रलयाला 20 वर्षे पूर्ण
मुंबई - आजचा दिवस म्हणजे मुंबईकरांच्या मनात कायमचे घर करून राहिलेल्या एका भयावह आठवणीचा दारुण ठसा आहे. 26 जुलै 2005 रोजी मुंबईवर आलेल्या जलप्रलायाला आज शनिवारी (26 जुलै 2025) 20 वर्षे पूर्ण झाली.

900 बसेस, 37000 रिक्षा आणि 4000 टॅक्सी पाण्याखाली
26 जुलै 2005 रोजी मुंबईवर आलेल्या जलप्रलायाला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दिवशी अवघ्या २४ तासांत 944 मिमी पावसाचा विक्रमी वर्षाव झाला, जो शंभर वर्षांतील सर्वाधिक होता. आणि या पावसात एक हजार मुंबईकरांना जलसमाधी मिळाली. बेस्टच्या 900 बसेस, 37000 रिक्षा आणि 4000 टॅक्सी पाण्याखाली गेल्या. संपत्तीचे किती नुकसान झाले याची काही मोजदादच नाही.
मुंबई थांबली होती, निसर्ग कोसळला होता
मुंबईतील कुर्ला, सांताक्रूझ, अंधेरी, सायन, माटुंगा, घाटकोपर, धारावी यांसारख्या घनदाट वस्ती असलेल्या भागांमध्ये पाणी गळ्यापर्यंत भरलं होतं. रेल्वेसेवा पूर्ण ठप्प झाली होती, रस्ंत्यावर वाहने तासन्तास अडकलेली, बेस्टच्या 900 बसेस, 37000 रिक्षा आणि 4000 टॅक्सी पाण्याखाली गेल्या होत्या. या प्रलयात सुमारे 1000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. हजारो घरे उद्ध्वस्त झाली. करोडो रुपयांचे नुकसान झाले. संपूर्ण महानगर तासन्तास वीजविहीन, संपर्कविहीन अवस्थेत होतं.
नागरिकांच्या जिवंत आठवणी
आज, २०२५ मध्येही त्या दिवसाच्या प्रत्यक्षदर्शींच्या आठवणी जशाच्या तशा जिवंत आहेत.
माटुंगा येथे राहणाऱ्या वाडकर म्हणाल्या :
"आम्ही घरात अडकून पडलो होतो. उंचावर गॅसची शेगडी ठेवून जेवण शिजवलं होतं. आजूबाजूला कुठेही वीज नव्हती, फोन बंद, आणि बाहेर अंधार आणि भीती. ते 12 तास आयुष्यातले सर्वात भयंकर होते."
सायनच्या शाळकरी मुलाचा अनुभव :
"शाळा सुटल्यावर घरी जाताना आम्ही रस्त्यावर अडकलो. 5 तास शाळेच्या बसमध्ये बसून होतो. श्वास कोंडायला लागला होता. आजही तो क्षण आठवला की अंगावर काटा येतो."
निसर्गाची ताकद आणि शहरी व्यवस्थेची मर्यादा
या महापुराने शहरी पायाभूत सुविधांच्या मर्यादा आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम उघड करून दाखवले. या घटनेनंतर प्रशासन आणि राज्य सरकारने नाले सफाई, आपत्ती व्यवस्थापन, जलनिकासी व्यवस्थेचे आधुनिकीकरण यावर भर दिला असला तरी आजही मुसळधार पावसात मुंबईची अवस्था फार वेगळी नाही, हेही वास्तव आहे.
२० वर्षांनंतरही धोक्याचा इशारा
पुन्हा २६ जुलैसाठी मुंबई आणि उपनगरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने उंच लाटा, अतिवृष्टी, धरणांतून विसर्गाचे इशारे दिले आहेत.
शिकवण देणारा इतिहास
या पार्श्वभूमीवर 26 जुलै 2005 ची आठवण केवळ एक स्मृती न राहता शिकवण देणारा इतिहास आहे. प्रशासन सज्ज असले तरी प्रत्येक नागरिकानेही सजग राहणे हेच खरे उत्तरदायित्व आहे.