राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार आहे. याबद्दल हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय काही भागांना अलर्टही जारी केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांतील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय राज्यात पावसाचा जोरही वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
20 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सध्या मान्सूनच्या प्रवाहात काहीसा अडथळा निर्माण झाला होता. पण पुढील दोन ते तीन दिवसांत परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. येत्या 20 जुलैनंतर नाशिक, पुणे, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, सांगली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि बीड जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढू शकतो.
कमी दाबाचा पट्टा तयार
देहरादून, पटना आणि बंकुरा परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात समुद्रसपाटीपासून सुमारे 900 मीटर उंचीवर वाऱ्याचा वेग बदलला गेला आहे. यामुळे महाराष्ट्रातही पुन्हा पावसाचे पुर्नगामन होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सोलापूर, धाराशिवसह काही भागांना यलो अलर्ट
आज सोलापूर, धाराशिव आणि कोकणातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्गासाठी हा पाऊस महत्त्वाचा मानला जात आहे. खरीप पिकांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई-ठाण्यात उकाड्यापासून दिलासा
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात गेल्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.


