Jejuri Morgaon Road Accident: पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात स्विफ्ट डिझायर कार आणि पिकअप टेम्पोची जोरदार धडक झाली. यात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

पुणे: पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर सोमवारी रात्री घडलेल्या एका भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. स्विफ्ट डिझायर कार आणि पिकअप टेम्पोमध्ये झालेल्या जोरदार धडकेत हा हृदयद्रावक प्रकार घडला. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारमधील पाच जण आणि टेम्पोतील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात बुधवारी रात्री सव्वा सातच्या सुमारास जेजुरी-मोरगाव मार्गावरील एका कंपनीसमोरील ‘श्रीराम’ ढाब्याजवळ घडला. पुण्याहून मोरगावच्या दिशेने निघालेली स्विफ्ट डिझायर कार (MH 42 AX 1060) ही जेजुरीमार्गे जात असताना, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आणि सामान उतरवत असलेल्या पिकअप टेम्पोला (MH 12 XM 3694) जोरात धडकली.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पिकअप टेम्पो ‘श्रीराम’ ढाब्यासमोर साहित्य उतरविण्याचे काम करत होता. त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने टेम्पोला जोरात धडक दिली. या दुर्घटनेत कारमधील पाच प्रवासी आणि टेम्पोतील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात आणखी पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी भीषणता पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अपघातामुळे जेजुरी-मोरगाव रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार वेगावर नियंत्रण न मिळाल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. मृतांचे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.

हा अपघात अनेक कुटुंबांवर काळाच्या छायेसारखा कोसळला आहे. रस्त्यावर सुरक्षितता पाळण्याचे आणि वाहन चालवताना सतर्क राहण्याचे पुन्हा एकदा गंभीर स्मरण या दुर्घटनेमुळे झाले आहे.