सार

गेल्या काही दिवसांपासून आंतरवाली सराटी गावाच्या परिसरात ड्रोन फिरताना दिसून आली आहे. जायकवाडी परिसरात ड्रोन फिरताना दिसून आला होता. जरांगेंच्या घरावरही ड्रोन

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. मनोज जरांगे यांचा मुक्काम सध्या अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरी आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील आकाशात ड्रोन फिरताना दिसून आला आहे. सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन मनोज जरांगे राहत असलेल्या घराभोवती घिरट्या घालत होता. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन हा ड्रोन पाहिला होता. आंतरवालीच्या गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असली तरी मराठा आंदोलक हे काहीसे धास्तावले आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी जरांगे यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. यासाठी पांडुरंग तारख हे आज जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता सरकार मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देणार का, हे पाहावे लागेल.

या मुद्द्यावर आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला. अंतरवली सराटी गावाची ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी सुरु आहे. यामुळे जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या सगळ्यामागे कोण आहे? अंतरवाली सराटी हे गाव मराठा आरक्षण आंदोलनासाठी ओळखले जाते. त्यामुळे याप्रकरणात आवश्यक असल्यास संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. गरज भासल्यास मनोज जरांगे यांना संरक्षण द्यावे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई जरांगेंच्या घराबाहेर फिरणाऱ्या ड्रोनबाबत काय म्हणाले?

राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या घराबाहेर फिरणाऱ्या ड्रोनबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. या संदर्भात चौकशी करुन सविस्तर अहवाल दिला जाईल. जरांगे पाटील यांना याआधी हत्यारी संरक्षण दिले आहे. पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलून अधिक संरक्षण देण्याची गरज असल्यास ते दिले जाईल, असे आश्वासन शंभुराज देसाई यांनी सभागृहात दिले.

अंतरवाली सराटीत मध्यरात्री नेमकं काय घडलं?

सोमवारी मध्यरात्री एक Drone मनोज जरांगे यांचा मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली. या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटीत अशाचप्रकारे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आला होता.

आणखी वाचा :

Vidhan Parishad Election : 'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या 5 जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक