मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांताक्रूझ येथे २४४.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, कोकणात मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई: पावसाने मुंबईमध्ये परत एकदा सुरुवात केली आहे. मुंबईसोबत कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु झाला आहे. सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८.३० या कालावधीत २४४.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाळ्यातील हा मुंबईचा सर्वात जास्त पाऊस पडला आहे. पावसाचा जोर कोकणात मंगळवार पर्यंत पडणार आहे.
मुंबईतील पावसाचा जोर वाढला
शुक्रवारी रात्रीनंतर पावसाचा जोर वाढत गेला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५.३०पर्यंत सांताक्रूझ येथे केवळ १६.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सकाळी ८.३०पर्यंत २४४.७ मिलीमीटर पाऊस पडला. कुलाबा येथे शनिवारी सकाळी ८३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचण्याची घटना मोठ्या प्रमाणावर घटना घडल्या आहेत.
कोकणात पाऊस पडणार
बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. यामुळे अरबी समुद्रातून बाष्प खेचले जात असून, याचा परिणाम कोकण विभागावर दिसत असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. हा प्रभाव पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट
कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे घाट विभागाला रविवार आणि सोमवारसाठी रेड ॲलर्ट आहे. कोल्हापूर घाट विभागाला रविवारी ऑरेंज, तर सोमवारी रेड ॲलर्ट देण्यात आला आहे. सातारा घाट विभागालाही रविवारी ऑरेंज, तर सोमवारी रेड ॲलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाण्याचे टाळावे असं अवाहन करण्यात आलं आहे.
