महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून, उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र: महाराष्ट्रात सगळीकडं पाऊस चांगला कोसळताना दिसून येत आहे. काही भागांमध्ये हवामान विभागाकडून अंदाज देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील धरण क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे परिसरातील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात चांगला पाऊस पडून गेला आहे.
सोसायट्यांमध्ये पाणी शिरले
पुणे शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. पाणी शिरल्यामुळं अनेक नागरिकांची गैरसोय झाली असून पार्किंगमधील गाड्या पाण्याखाली भिजल्या आहेत. गेल्यावर्षी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी ती तयार होऊ नये म्हणून महानगरपालिकेकडून खासकरून काळजी घेण्यात आली आहे. खडकवासला धारणातून मुठा नदी पात्रात 28 हजार 662 क्युसेक विसर्ग सुरु आहे.
विदर्भात दमदार पाऊस
गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे. तीन दिवस मुसळधार पाऊसानंतर थोडी विश्रांती मिळालेली असली, तरी आज पुन्हा सकाळपासून रिपरिप सुरु झाली आहे. काही भागांत जोरदार पाऊस झाला असून, काही ठिकाणी मात्र हलक्या सरी कोसळत आहेत. विदर्भात बहुतेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे.
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु
पंढरपूरजवळील उजनी आणि वीर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरणातून सुमारे 71,000 क्यूसेक तर वीर धरणातून 31,000 क्यूसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, नदी पात्रातील पुंडलिक मंदिर आणि इतर लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
एकूण जवळपास एक लाख क्यूसेकपेक्षा अधिक पाणी भीमा नदीत सोडल्यामुळे दुपारपर्यंत हे पाणी पंढरपूरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहराला महापुराचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. चंद्रभागेचे वाळवंट आणि घाटसुद्धा आता पाण्याखाली गेले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेवर ताण पडल्याचे चित्र दिसत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कोकण आणि घाटमाथा भागात आज पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
