मनोज जरांगे यांनी ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. गणेशोत्सवाच्या सुट्टीच्या दिवशीही हायकोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली असून, राज्य सरकारने आंदोलनामुळे पोलिसांवरील ताण वाढल्याचे म्हटले आहे.

मुंबई: ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आझाद मैदानावर त्यांच्यासोबत अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. आज दुपारी मुंबई हायकोर्टामध्ये या प्रकरणावरून सुनावणीला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त असलेल्या सुट्टीचा आजचा (1 सप्टेंबर) अखेरचा दिवस असतानाही न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर आजच ही सुनावणी होणार आहे.

सदावर्ते यांनी तातडीने सुनावणी करण्याची केली मागणी 

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी गेल्यावर्षीच्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या वेळी त्याला विरोध दर्शवणारी याचिका केली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. याचबरोबर यावर्षीच्या आझाद मैदानातील आंदोलनाला विरोध दर्शवणारी याचिका ‘एमआयए’ फाऊंडेशनचे अनिलकुमार मिश्रा यांनी केली आहे.

राज्य सरकार काय म्हणाले?

 ‘मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात आधीच मुंबई पोलिस व प्रशासनांवर प्रचंड ताण असताना मुंबईत मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमल्यास कठीण होईल, असं म्हणणं राज्य सरकारने हायकोर्टामध्ये मांडले होते. आझाद मैदानावर उपोषण करताना फक्त ५००० जणांच्या जमावाला पोलिसांच्या वतीने परवानगी देण्यात आली होती.

दरदिवशी नव्याने परवानगी देणे सुरु 

आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आंदोलकांना दररोज पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागत होती. आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात आंदोलक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिले होते. मुंबईत आंदोलक मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडून पडले आहे. त्यामुळं न्यायालय आता काय निकाल देत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.