सार
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. २४ दिवस उलटूनही मुख्य आरोपीसह ३ आरोपी अजूनही फरार आहेत.
बीड: जिह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बुधवारी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची(एसआयटी) स्थापना केली आहे. राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार एसआयटीचे नेतृत्व पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली करतील. या एसआयटीत १० सदस्य असतील. एसआयटीमधील सर्व अधिकारी हे बीड जिल्ह्यातील आहेत.
हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हत्या प्रकरणाची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही सरकारकडून एसआयटी बाबत काहीही हालचाली करण्यात आल्या नव्हत्या. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी जलसमाधी आंदोलन करत फरार आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर सरपंच हत्याप्रकरणाचं गांभीर्य वाढत असल्याचं पाहून अखेर राज्य सरकारनं एसआयटी नेमण्याचं आदेश दिले आहेत.
एसआयटीमध्ये कोणते अधिकारी ?
एसआयटीमध्ये बीड सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज वाघ, केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंद्रकांत काळकुंटे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे, पोलीस शिपाई संतोष गित्ते यांचा समावेश आहे.
२४ दिवस झाले तरी मुख्य आरोपीसह ३ आरोपी फरार
सरपंच देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला २४ दिवस झाले तरी मुख्य आरोपीसह ३ आरोपींना अटक करण्यात यश आलेले नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे. त्याला केज येथे आणण्यात आले आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायाधिशांनी त्याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. सीआयडीने वाल्मिक कराडची कसून चौकशी सुरू केली आहे. त्याला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवलेले आहे.
आणखी वाचा-
वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी
जळगावच्या पाळधी गावात दोन गटात राडा; वाहने आणि दुकाने जाळली, संचारबंदी लागू