Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात कार कालव्यात कोसळून पती-पत्नी बेपत्ता झाले असून बचावासाठी गेलेला तरुणही हरवला आहे.  

Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात सोमवारी उशिरा रात्री भीषण अपघात घडला. चांगतपुरी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत चालकाने उडी मारून जीव वाचवला; मात्र कारमधील पती-पत्नी पाण्यात बुडाले असून ते अद्याप बेपत्ता आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कालव्याच्या पुलालगत कारचा ताबा सुटला

मिळालेल्या माहितीनुसार, चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलालगत चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट पाण्यात गेली. अपघाताची वेळ रात्री सुमारे 11 ते 11.30 वाजताची आहे. पाण्याचा प्रवाह असल्याने कारमधील दोघेही बाहेर पडू शकले नाहीत. चालकाने प्रसंगावधान राखत कारबाहेर उडी मारली आणि बचावला.

बचावकार्य सुरू; तरुणही बेपत्ता

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने कार पाण्याबाहेर काढण्यात आली; मात्र पती-पत्नींचा शोध सुरूच आहे. दरम्यान, मदतीसाठी पाण्यात उतरलेला गावातील एक तरुणही बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकूण तिघांचा शोध मोहिमेअंतर्गत सुरू आहे.

भंडाऱ्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे दुचाकी आणि भरधाव वाहनामध्ये अमोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. वडण मार्गावर दोन्ही वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. पालांदूर पोलीस यांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुचाकीच्या नंबर प्लेटच्या आधारे तपास केला जात आहे.