काही जणांनी सांगितले, की विघ्नेश रिल्स तयार करत होता. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. तो पाण्यात बुडाला. परंतु, त्याचा मृतदेह सापडला नव्हता. शनिवारी रात्री त्याचा मृतदेह सापडला.

मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावर बुडालेला २० वर्षीय युवक अखेर मृत अवस्थेत सापडला. शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी बुडाल्यानंतर तब्बल १४ तासांनंतर म्हणजे रात्री मृतदेह किनाऱ्यावर आढळला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

मृत युवकाची ओळख विघ्नेश मुरुगेश देवेन्द्रन (वय २०) अशी झाली आहे.

विघ्नेश शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता जुहूतील गोदरेज गेटजवळील सिल्व्हर बीचवर समुद्रात उतरला होता. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला आणि तो बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, विघ्नेश देवेन्द्रन आणि राजकुमार सुब्बा (वय २२) हे दोघे समुद्रात अंदाजे २०० मीटर अंतरावर असताना बुडू लागले. यावेळी बचावकर्त्यांनी तत्काळ कारवाई करत राजकुमार सुब्बाची सुटका केली. मात्र विघ्नेशचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. मुंबई अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली होती. मात्र भरतीमुळे दुपारी १.४५ वाजता शोधकार्य थांबवावे लागले.

शेवटी, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता स्थानिक मच्छीमार आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने विघ्नेशचा मृतदेह किनाऱ्यावर आढळून आला. त्याला तात्काळ जवळच्या महापालिका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पावसाळ्यात अरबी समुद्र अनेकवेळा खवळलेला असतो आणि अशा काळात नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी किंवा मासेमारीसाठी जाणे टाळावे, असा इशारा प्रशासनाकडून सातत्याने दिला जातो.