Eknath Shinde On Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 'आज माझा मोठा भाऊ गेला,' असे म्हणत शिंदेंना अश्रू अनावर झाले. 

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दुःखद घटनेवर राजकीय वर्तुळातून तीव्र शोकभावना व्यक्त केली जात असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया विशेषतः भावूक ठरली. “आज माझा मोठा भाऊ गेला,” असे म्हणत एकनाथ शिंदेंना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले.

शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत त्यांच्या राजकीय वाटचालीचा आणि राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा कृतज्ञतेने उल्लेख केला.

‘मनाला चटका लावणारी घटना’

माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आजची घटना अत्यंत वेदनादायक आहे. अजित पवार यांनी अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व केले. त्यांचा परखड स्वभाव, स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड संपूर्ण राज्याने अनुभवली आहे. कोणत्याही विषयावर बोलण्याआधी सखोल अभ्यास करण्याची त्यांची सवय होती. रोखठोक बोलणारे असले, तरी मनाने ते अत्यंत निर्मळ होते, असा अनुभव मला स्वतःला आहे, असे शिंदे म्हणाले.

‘टीम म्हणून आम्ही काम केलं’

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री होते. त्या काळात लाडकी बहीण योजना तसेच इतर महत्त्वाच्या योजनांसाठी त्यांनी आर्थिक तरतूद अत्यंत प्रभावीपणे केली. एकदा एखादा निर्णय घेतला की तो पूर्णत्वास नेण्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. ‘पाहू, करू’ असा दृष्टिकोन त्यांचा कधीच नव्हता. आम्ही एक संघ म्हणून काम केलं, असे शिंदे यांनी सांगितले.

वेळेचं भान असलेला नेता हरपला

अजित पवार यांच्या कामाच्या शिस्तीचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, अजितदादा पहाटे लवकर कामाला सुरुवात करायचे. वेळेचे महत्त्व ओळखणारा आणि कामाचा प्रचंड झपाटा असलेला नेता आज आपल्यातून निघून गेला आहे.

‘फक्त पवार कुटुंबाचं नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान’

एकनाथ शिंदे म्हणाले की, अजित पवार हे राजकारणातील अनुभव, वय आणि विचार या सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे होते. विविध विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास मंत्रिमंडळाच्या कामकाजात नेहमीच उपयोगी पडायचा. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबाचंच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालं आहे.

भावूक होत शिंदे पुढे म्हणाले, राजकारणात आम्ही जरी सहकारी म्हणून काम करत असलो, तरी वैयक्तिक आयुष्यात ते माझ्यासाठी मोठ्या भावासारखे होते. आज तो मोठा भाऊ हरपल्याचं दुःख मनात खोलवर आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.