उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. आज सकाळी त्यांचे विमान लँडिंगच्या तयारीत असताना कोसळले, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या घटनेने राज्याने एक करारी आणि कामाला झोकून देणारा नेता गमावला आहे.
बारामती : आजची सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक ठरली. कामाचा प्रचंड झपाटा, शिस्तबद्ध दिनक्रम आणि रोखठोक निर्णयांसाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आल्याने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबीय, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे.
बारामतीजवळ भीषण विमान अपघात
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८.१५ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना शेजारच्या शेतात कोसळले. हे विमान VSJ Ventures कंपनीचे Lear Jet असल्याची माहिती आहे. अपघातानंतर जोरदार स्फोट झाले असून घटनास्थळी आगीचे लोट उठल्याचे सांगण्यात येत आहे.
या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती पसरली आहे. या घटनेने महाराष्ट्राने एक करारी, परखड आणि कामाला झोकून देणारा नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कामाचा ‘वाघ माणूस’
अजित पवार हे भल्या पहाटे उठून कामाला सुरुवात करणारे नेते म्हणून ओळखले जात होते. सकाळच्या वेळेतच बसस्थानके, उद्याने, सार्वजनिक ठिकाणी अचानक भेट देऊन तेथील व्यवस्था तपासणे आणि प्रशासनाला तात्काळ सूचना देणे, हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे प्रशासनात त्यांचा आदरयुक्त धाक होता. मात्र, आज सकाळी आलेल्या या दुःखद बातमीने अनेक अधिकारी, कर्मचारी भावूक झाल्याचे चित्र दिसून आले.
आजचा नियोजित दौरा आणि सभा
आज अजित पवार हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमात तब्बल चार जाहीर सभा नियोजित होत्या.
आजचे नियोजित सभा स्थळे व वेळा
निरवागज – सकाळी १०.०० वाजता
पांडरे – दुपारी १२.०० वाजता
करंजेपूल – दुपारी ३.०० वाजता
सुपा – सायंकाळी ५.३० वाजता
मात्र, या सभा सुरू होण्यापूर्वीच अपघात झाल्याची माहिती समोर आली.
विमानात कोण होते?
सूत्रांच्या माहितीनुसार, या ८ आसनी चार्टर्ड विमानात अजित पवार, त्यांचे दोन सहाय्यक, दोन पायलट आणि इतर कर्मचारी होते. विमान कोसळल्यानंतर सलग स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर तातडीने आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.
ही बातमी राज्यभर वाऱ्यासारखी पसरताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनेक सहकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना अश्रू अनावर झाले असून, अनेकांच्या तोंडून शब्दही फुटत नसल्याची स्थिती आहे.


