Dhananjay Munde : सावरगाव घाटावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी आरक्षणाबाबत ठाम भूमिका घेतली. मराठा समाजाला आरक्षण दिलं याचा आनंद असल्याचं सांगून त्यांनी ओबीसींचे हक्क हिरावू नका, असं स्पष्ट केलं.
Dhananjay Munde : सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात भाषण करताना धनंजय मुंडे म्हणाले की, “मी विद्यार्थी चळवळीपासून प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा कार्यकर्ता आहे.” मराठा समाजाला आरक्षण मिळालं याचा आम्हाला आनंद आहे, कारण आम्ही त्या चळवळीत होतो. मात्र काही जण मराठा आरक्षणाच्या आडून ओबीसींच्या हक्कांवर डोळा ठेवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
“ओबीसींचं ताट रिकामं करू नका”
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना धनंजय मुंडेंनी उदाहरण देत सांगितलं की, “ओबीसींचा कटऑफ 485 आहे, तर ईडब्ल्यूएसचा 450. तरीही काहीजण राजकारण करत आहेत. सरकारने मराठा समाजासाठी जे करायचं ते केलं आणि करत आहेत, पण याच्यातून ओबीसींचं ताट रिकामं करून दुसऱ्याच्या ताटात नका टाकू.”
कोर्टातून मिळालेली क्लिनचीट
आपल्याविरोधात झालेल्या मीडिया ट्रायलचा उल्लेख करताना धनंजय मुंडेंनी सांगितलं की, “माझ्या पक्षातीलच काही जणांनी माझ्यावर आरोप केले, पण कोर्टातून मला क्लिनचीट मिळाली. उलट कोर्टाने याचिका करणाऱ्यांनाच दंड ठोठावला.” या काळात बहीण पंकजा मुंडे यांनी आधार दिला, असेही त्यांनी नमूद केले.
जातीय वैमनस्याला आव्हान
धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणाच्या शेवटी जातीयतेवर प्रहार केला. “बीड जिल्ह्यात जाती-पातीमुळे जिगरी दोस्तांची दोस्ती तुटली आहे. हे वातावरण मोडायचं आहे आणि द्वेष संपवायचा आहे. आम्ही कुणाच्या विरोधात नाही आणि कुणाला विरोधही करत नाही,” असे ते म्हणाले.


