RSS 100 Years : RSS ला 100 वर्षे पूर्ण. 1925 मध्ये के.बी. हेडगेवार यांनी नागपुरात स्थापन केलेल्या या संघटनेचा उद्देश राष्ट्र उभारणी आणि सांस्कृतिक जागरूकता पसरवणे आहे. जगभरातील 39 देशांमध्ये याच्या शाखा आहेत. या संघटनेचे 14,35,980 स्वयंसेवक आहेत.
RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2 ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर संघ आपला शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. याअंतर्गत 2 ऑक्टोबर 2025 ते 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत देशभरात सात मोठे कार्यक्रम आयोजित केले जातील. यानिमित्ताने 1 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींनी राष्ट्राच्या विकासात RSS च्या योगदानाला अधोरेखित करणारे एक स्मारक टपाल तिकीट आणि 100 रुपयांचे नाणेही जारी केले. यावेळी ते म्हणाले, 'संघाचे स्वयंसेवक अविरतपणे देशाची सेवा करत आहेत. ते समाजाला मजबूत करत आहेत. यासाठी मी देशवासियांना शुभेच्छा देतो.'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी आणि का झाली?
एक राष्ट्रवादी संघटना म्हणून 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूरमध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. नागरिकांमध्ये सांस्कृतिक जागरूकता, शिस्त, सेवा आणि सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे राष्ट्र उभारणीसाठी एक लोक-समर्थित आंदोलन आहे. संघाचा मुख्य भर देशभक्ती आणि राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीवर आहे. लोकांमध्ये मातृभूमीप्रती समर्पण, शिस्त, संयम, साहस आणि शौर्य निर्माण करण्याचा संघाचा प्रयत्न आहे.
हेडगेवारांनी काँग्रेससोडून RSS ची स्थापना केली
केशव हेडगेवार हे बाळ गंगाधर टिळकांचे अनुयायी होते. 1920 मध्ये टिळकांच्या निधनानंतर, त्यांच्या इतर अनुयायांप्रमाणेच हेडगेवारांनीही महात्मा गांधींनी घेतलेल्या काही निर्णयांना विरोध केला. विशेषतः गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्याच्या ते अजिबात बाजूने नव्हते. गोरक्षा हा काँग्रेसच्या अजेंड्यात नव्हता. त्यामुळे हेडगेवार आणि टिळकांच्या काही अनुयायांनी गांधींशी संबंध तोडले. त्यानंतर 1921 मध्ये हेडगेवारांना त्यांच्या काही भाषणांवरून देशद्रोहाचा आरोप लावून तुरुंगात टाकण्यात आले. तथापि, जुलै 1922 मध्ये त्यांची सुटका झाली. यानंतर, त्यांना एक अशी संघटना स्थापन करण्याची गरज वाटली, जिचा उद्देश राष्ट्रवादी विचारधारेला पुढे नेत राष्ट्र उभारणी करणे असेल. याच दरम्यान, 1923 मध्ये नागपुरात हिंदूविरोधी दंगली झाल्या, त्यानंतर हेडगेवारांनी हिंदू समाजाला संघटित करण्याचा निर्धार केला.
39 देशांमध्ये RSS च्या शाखा कार्यरत
गेल्या 100 वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताबाहेर संपूर्ण जगात पोहोचला आहे. जगभरातील 39 देशांमध्ये याच्या शाखा कार्यरत आहेत. सध्या RSS चे 14,35,980 स्वयंसेवक आहेत. संघाची पहिली शाखा नागपुरात काही मोजक्या तरुणांसोबत सुरू झाली होती. हळूहळू इतर प्रांतांमध्येही शाखा सुरू झाल्या. संघटनेने स्थापनेपासूनच राष्ट्र उभारणीचे उद्दिष्ट स्वीकारले आहे. या मार्गावर सातत्याने पुढे जाण्यासाठी संघाने एक शिस्तबद्ध कार्यपद्धती अवलंबली आहे, ज्याअंतर्गत शाखांचे दैनंदिन आणि नियमित संचालन केले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सर्वात महत्त्वाचे पद संघप्रमुख म्हणजेच सरसंघचालकांचे असते. त्यांची निवड संघाच्या "प्रतिनिधी सभे"च्या बैठकीत होते. संघाची स्वतःची लोकशाही रचना असली तरी, अंतिम निर्णय सरसंघचालकांचाच असतो. आतापर्यंतच्या संघाच्या इतिहासात प्रत्येक सरसंघचालकाने आपला उत्तराधिकारी स्वतः निवडला आहे. संघात ही परंपरा आजही सुरू आहे.
| क्रमांक | सरसंघचालकांचे नाव | कालावधी |
| 1- | डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार | 1925 ते 1940 |
| 2- | माधवराव सदाशिवराव गोळवलकर | 1940 ते 1973 |
| 3- | मधुकर दत्तात्रय देवरस | 1973 ते 1994 |
| 4- | प्राध्यापक राजेंद्र सिंह | 1994 ते 2000 |
| 5- | कृपाहल्ली सीतारमैया सुदर्शन | 2000 ते 2009 |
| 6- | डॉक्टर मोहनराव मधुकरराव भागवत | 2009 पासून आतापर्यंत |


