- Home
- Maharashtra
- CIDCO Lottery 2025: नवी मुंबईत स्वस्त घर घेण्याची सुवर्णसंधी, तब्बल 22,000 घरांची भव्य लॉटरी; जाणून घ्या कधी होणार सोडत!
CIDCO Lottery 2025: नवी मुंबईत स्वस्त घर घेण्याची सुवर्णसंधी, तब्बल 22,000 घरांची भव्य लॉटरी; जाणून घ्या कधी होणार सोडत!
CIDCO Lottery 2025: सिडको लवकरच नवी मुंबईत 22000 घरांची भव्य लॉटरी जाहीर करणार आहे. ही घरे वाशी, खारघर, तळोजा आणि द्रोणगिरी यांसारख्या विकसित नोड्समध्ये उपलब्ध असतील. दसरा किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर ही लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे.

22000 स्वस्त घरांची लॉटरी
नवी मुंबई: मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचं घर असावं, हे स्वप्न अनेकांचं असतं. पण प्रचंड महागड्या घरांच्या दरांमुळे हे स्वप्न अनेकांसाठी अजूनही स्वप्नच राहिलंय. मात्र आता तुमचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची संधी पुन्हा चालून आली आहे. ती सुद्धा सिडकोच्या माध्यमातून!
लवकरच सुरु होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारी असलेल्या भागांमध्ये CIDCO (सिडको) 22000 घरांची भव्य लॉटरी घेऊन येत आहे. दसरा किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर ही लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.
कुठे मिळणार घरे?
ही घरे नवी मुंबईतील विविध विकसित नोड्समध्ये उपलब्ध असतील. यामध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे.
वाशी
जुईनगर
खारघर
तळोजा (पनवेल)
द्रोणगिरी
या सर्व नोड्समध्ये घरांची सोय असणार असून, सार्वजनिक वाहतूक, मेट्रो, आणि विमानतळाजवळची ही लोकेशन्स घर खरेदीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
घरांच्या किमती काय असतील?
सध्या सिडकोच्या घरांचे दर सामान्य नागरिकांना परवडतील असे वाटत नाहीत, त्यामुळे घरांच्या किमती आणखी कमी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. या संदर्भात सरकारसोबत चर्चा सुरू आहे आणि भविष्यात काही दिलासा मिळू शकतो, अशी आशा विजय सिंघल यांनी व्यक्त केली आहे.
का काढली जात आहे ही जम्बो लॉटरी?
गेल्या काही वर्षांत सिडकोच्या अनेक लॉटरीमध्ये काही घरे विकली गेली नाहीत. अनेक घरे विक्रीअभावी रिकामी पडून आहेत. तसेच, काही प्रकल्पांचे बांधकामही पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे या सगळ्या घरांचा एकत्रित जम्बो लॉटरीद्वारे पुनर्विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.
लवकरच जाहिरात होणार!
या लॉटरीसंदर्भात अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये घरांची अचूक किंमत, अर्जाची प्रक्रिया, पात्रता याबाबतची सविस्तर माहिती मिळेल.
तुमचं घर तुमच्या नावावर, तेही नवी मुंबईसारख्या प्रगत शहरात!
जर तुम्ही नवी मुंबई परिसरात स्वप्नातील घर घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी चुकवू नका. वेळोवेळी अपडेट्स मिळवण्यासाठी सिडकोच्या अधिकृत वेबसाइटवर नजर ठेवा.

