राज्य सरकारमधील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि असभ्य वर्तनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. विधानसभेच्या सत्रात एका मंत्र्याचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इशारा दिला आहे.
नागपूर – राज्य सरकारमधील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि असभ्य वर्तनामुळे सध्या सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे की "बेशिस्त वर्तन आणि वादग्रस्त वक्तव्ये यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते. हे वर्तन खपवून घेतले जाणार नाही."
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना फटकारले
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "तुम्हाला लाज वाटत नाही का? समाजात जबाबदारीची भूमिका बजावताना अशी वागणूक शोभत नाही." मंत्र्यांनी आपल्या वर्तनाबाबत जबाबदारीने विचार केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेच्या सत्रात एका मंत्र्याचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना घडली आहे.
मंत्रिमंडळाला शिस्तीचा दिला इशारा
या प्रकारामुळे सरकारची विश्वासार्हता धोक्यात येते, असे फडणवीस यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, “लोक आम्हाला त्यांच्या प्रश्नांसाठी निवडून देतात, खेळण्यासाठी नाही.” ही शेवटची संधी आहे, पुन्हा असे काही घडल्यास कारवाई अटळ असेल, असा इशाराही त्यांनी दिला. शेतमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. कोकाटेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील फटकारले होते. त्यानंतर आता फडणवीसांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला शिस्तीचा इशारा दिला आहे.
फडणवीस म्हणाले, “आपण जेव्हा सरकारमध्ये असतो, तेव्हा प्रत्येक कृती समाजामध्ये उदाहरण ठरत असते. त्यामुळे जपून बोलणं आणि वागणं आवश्यक आहे.” मंत्र्यांनी आपली वक्तव्यं आणि कृतींवर नियंत्रण ठेवायला हवे, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, हे विधान अधिक महत्त्वाचं मानलं जात आहे. सरकारने चांगलं काम करूनही अशा वादांमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे आता मंत्र्यांनी वादात न पडता, विकासाच्या कामावर लक्ष केंद्रित करावं, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला.
