Chembur School Bus : मुंबईतील चेंबूर येथे शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. यावर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. अशातच भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी आणि कमकुवत झाडे हटवण्याची मागणी केली आहे.
Chembur School Bus : मुंबईतील चेंबूर येथे मुसळधार पावसादरम्यान शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यावर राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याशिवाय धोकादायक झाडांची वेळेत छाटणी न झाल्याने हा अपघात घडल्याची टीका देखील केली जात आहे. यावर राज्य सरकारने दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

संजय उपाध्यायांच्या प्रशासनाला सूचना
भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी आणि कमकुवत झाडे हटवणे अत्यावश्यक आहे. झाडांचे संवर्धन महत्त्वाचे असले तरी मानवी जीव अधिक मौल्यवान आहे. वेळेत छाटणी न झाल्यामुळे अशा दुर्घटना घडतात. यामुळे महापालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
दोषींवर कठोर कारवाई होणार
राज्याचे मंत्री योगेश कदम यांनी देखील चेंबूरमधील दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. योगेश कदम यांनी म्हटले की, “या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.”
सुनेत्रा पवारांकडून दुःख व्यक्त
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांनी मृत विद्यार्थ्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय त्याच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
12 विद्यार्थ्यांपैकी पाच जखमी
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या बसमध्ये एकूण 12 विद्यार्थी प्रवास करत होते. झाड कोसळल्यानंतर बस चालक, वाहक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. तर एका मुलाची प्रकृती गंभीर होती. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने झेन रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.


