Sanjay Shirsat vs Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (शिंदे गट) यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ते सिगारेट ओढताना आणि त्यांच्या शेजारी बॅगेत भरलेली नोटांची बंडलं असल्याचे दिसत आहे.
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिरसाट एका खोलीत सिगारेट ओढताना, बेडवर बसलेले दिसतात आणि त्यांच्या शेजारी बॅगेत भरलेली नोटांची बंडलं असल्याचा दावा करण्यात आला आहे.
राऊतांनी हा व्हिडीओ मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत सवाल केला “देशात नक्की काय सुरू आहे?”
“हा व्हिडीओ रोमांचक आहे, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पाहायला हवा. एका मंत्र्याचा हा व्हिडीओ खूप काही सांगतो. फडणवीस यांना आता तरी कृती करायची की अजूनही अब्रू गमावत बसायचं?” – संजय राऊत
शिरसाटांचं स्पष्ट उत्तर, "तो माझ्या बेडरूममधील व्हिडीओ आहे!"
राऊतांच्या आरोपांवर शिरसाटांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, “हा व्हिडीओ माझ्या खासगी बेडरूममधील आहे. प्रवास करून आलो होतो, थकलेलो होतो, आणि बेडवर बसलेलो आहे. शेजारी आमचा पाळीव कुत्राही आहे. ज्यांना बॅगमधून पैसे दिसतात, त्यांचं डोकंच ठिकाणावर नाही!”
“माझ्याकडे मातोश्री नाही, ना मातोश्री २. माझं घर सर्व कार्यकर्त्यांसाठी उघडं आहे. कोणीतरी उत्साहात व्हिडीओ काढला असावा. यात लपवण्यासारखं काही नाही.” – संजय शिरसाट

राजकारण तापलंय, चौकशी होणार का?
या व्हिडीओने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजवली आहे. राऊतांचा दावा आहे की हा व्हिडीओ आयकर विभागाच्या नोटिशीनंतर त्यांच्यापर्यंत पोहोचला. आता यावर चौकशी होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


