अॅप-आधारित कॅब चालकांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आजचा वेळ देऊ केला आहे. अन्यथा उद्यापासून चक्का जाम करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
मुंबई : राज्यातील अॅप-आधारित कॅब चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गिग कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे चालक सध्या उपोषण करत असून, जर त्यांचा मुद्दा सरकारने ऐकून घेतला नाही, तर येत्या २३ जुलैपासून मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये 'चक्का जाम' आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या या आंदोलनात कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यात भाडे नियंत्रण, कमिशनची मर्यादा, सामाजिक सुरक्षा योजना यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. मागील अनेक महिन्यांपासून सरकारने यावर फक्त आश्वासने दिली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत, असा आरोप संघटनेने केला आहे.
डॉ. क्षीरसागर म्हणाले, “आम्ही १९ जुलैपासून सुरू असलेला आमचा बेमुदत संप तात्पुरता स्थगित करून सरकारला वेळ दिला आहे. २२ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं, तर २३ जुलैपासून आम्ही तीव्र आंदोलन छेडू. हे केवळ प्रतीकात्मक आंदोलन नसेल, तर खरा चक्का जाम असेल.”
या आंदोलनाचा फटका थेट प्रवाश्यांना बसणार असून मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या गर्दीच्या शहरांत वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अद्याप प्रशासनाकडून या इशाऱ्यावर कोणताही अधिकृत प्रतिसाद देण्यात आलेला नाही.


