Bhide Bridge: पुण्यातील डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळील भिडे पूल पादचारी पुलाच्या कामामुळे १० सप्टेंबर २०२५ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. नागरिकांना संभाजी पूल, शिंदे पूल, गाडगीळ पूल या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची माहिती डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महामेट्रोकडून या भागात नदीवरील पादचारी पुलाचे काम पुन्हा सुरू करण्यात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

बंद होण्याची तारीख आणि कारण

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही काळासाठी पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता. मात्र, आता 10 सप्टेंबर 2025 पासून काम पुन्हा सुरू होत असून, सुरक्षेच्या कारणास्तव भिडे पूल बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

महामेट्रोकडून नागरिकांना खालील पर्यायी पुलांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संभाजी पूल

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल

काकासाहेब गाडगीळ पूल

या मार्गांचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भिडे पूल आणि इतिहासाचा मागोवा

भिडे पूल हा सदाशिव, नारायण आणि शनिवार पेठ भागांना डेक्कन जिमखाना परिसराशी जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. जड वाहनांना प्रवेश नसतानाही इथे दररोज अनेक वाहने ये-जा करतात. 1990 च्या दशकात वर्दळ वाढल्यामुळे पूल पुनर्बांधणीची गरज भासली आणि 1996 च्या सुमारास नवा पूल बांधण्यात आला. या पुलाचे नाव जनसंघाचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ बाबा भिडे यांच्या नावावरून देण्यात आले होते. यापूर्वी येथे जुन्या कॉजवेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे.

वाहतूक आणि नागरिकांचं सहकार्य महत्त्वाचं

भिडे पूल बंद राहिल्याने काही काळसाठी त्रास होऊ शकतो. मात्र, नवीन पादचारी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून महामेट्रोला सहकार्य करावे, असं आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.