Baramati By Election : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दोन्ही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. 23 एप्रिलला मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Baramati By Election : राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्धार काँग्रेसने केला असून, पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

उमेदवार निश्चितीपूर्वी मित्रपक्षांशी चर्चा

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून स्थानिक समीकरणांचा आढावा घेण्यात आला आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे योग्य उमेदवार निवडण्यासाठी पक्ष नेतृत्व सावध भूमिका घेत आहे. राहुरीसाठी उमेदवार निश्चिती अंतिम टप्प्यात असून, दोन्ही ठिकाणी मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बारामतीसाठी ६ तर राहुरीसाठी ४ अर्ज प्राप्त झाले आहेत. पक्षश्रेष्ठींशी चर्चा पूर्ण झाली असून, उमेदवार निश्चितीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. येत्या दोन दिवसांत काँग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मतदान आणि मतमोजणीच्या तारखा जाहीर

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. राहुरीची जागा भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे, तर बारामतीची जागा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे.

पोटनिवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

  • अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
  • अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : 6 एप्रिल 2026
  • अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
  • अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
  • मतदान : 23 एप्रिल 2026
  • मतमोजणी : 4 मे 2026
  • प्रक्रिया पूर्ण : 6 मे 2026