नाशिकमध्ये एका वाईन शॉप कर्मचाऱ्याचा, सुनील अनिल तायडे यांचा, प्रेशर गनमधून निघालेला खिळा छातीत घुसून मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक ग्राहक संशयास्पद हालचाल करताना दिसत असल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे.
महाराष्ट्र हादरवून सोडणारी एक घटना नाशिक मधून समोर आली आहे. इथे एका ३९ वर्षीय वाईन शॉप कर्मचाऱ्याच्या छातीत प्रेशर गनचा लोखंडी खिळा थेट हृदयापर्यंत घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सिडको परिसरातील स्टेट बँक चौकाजवळील 'लिकर कट्टा' येथे सोमवारी संध्याकाळी घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनील अनिल तायडे असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ते काउंटरवर उभे होते. अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ६:५१ च्या सुमारास ते खाली कोसळले. दुकानातील लोकांनी पाहिले तेव्हा त्यांच्या छातीत एक लोखंडी खिळा घुसला होता आणि रक्तस्त्राव होत होता.
सहकाऱ्यांनी आणि उपस्थित लोकांनी तायडे यांना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तब्बल चार तास त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती.
CCTV फुटेजमुळे वाढले गूढ
सुरुवातीला ही घटना प्लायवूडच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रेशर गनमुळे झालेला अपघात असल्याचे बोलले जात होते. पण दुकानातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर तायडे यांना खिळा कसा लागला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या फुटेजमध्ये एक ग्राहक दुकानात येऊन गर्दीत उभा असल्याचे दिसते. काही क्षणांतच तो शेजारच्या व्यक्तीला धक्का देतो आणि काउंटरच्या मागे असलेल्या तायडे यांच्या दिशेने काहीतरी हालचाल करतो. त्यानंतर तो ग्राहक लगेच तिथून निघून जातो. नेमकं काय घडलं, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता या फुटेजची बारकाईने तपासणी करत आहेत.
व्हिडिओवर सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया
अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना अपघात होती की जाणीवपूर्वक केलेला कट, याचा तपास पोलीस करत आहेत. अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.
या फुटेजमुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सच्या मते त्या ग्राहकाच्या हालचाली संशयास्पद वाटत आहेत, तर काहींनी याला थेट खून म्हटले आहे. एका युजरने सुरक्षेचे कडक नियम असण्याची गरज बोलून दाखवली. तर दुसऱ्याने, जीवघेणी दुखापत करू शकणारी नेल गन दुकानात कशी काय उपलब्ध होती, असा सवाल उपस्थित केला आहे.




