दिवाळीच्या तोंडावर खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट भाडे आकारले जात असून, काही तिकिटे तर थेट ७ हजार रुपयांवर पोहोचली आहेत. यावर कारवाईसाठी पुणे RTO ने १ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली असून ती २० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
मुंबई : दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी चांगलीच अडवणूक सुरू केली आहे. काही मार्गांवर तर तिकीट थेट ६ ते ७ हजार रुपयांवर पोहोचलंय. सणासुदीच्या गर्दीचा फायदा घेत हे ऑपरेटर नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट भाडे उकळत आहेत. ऐनवेळी तिकीट बुक करणाऱ्यांकडे दुसरा पर्यायच उरत नाहीये. या मनमानी कारभारामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, लोक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन विभागाला जाब विचारत आहेत.
वाढत्या तक्रारींची दखल घेत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) खाजगी बसेसवर कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. १ नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही तपासणी मोहीम २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
तिकीट थेट ७ हजारांवर, प्रवाशांचा संताप
अनेक प्रवाशांनी X (ट्विटर) वर आपल्या तक्रारी मांडत दिवाळीतील या भरमसाठ तिकीट दरवाढीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
एका युजरने सांगितलं की, ७०० रुपयांचं तिकीट थेट ४,००० रुपयांवर गेलंय. तर दुसऱ्या एका प्रवाशाने काही मार्गांवर तिकीट ६ ते ७ हजार रुपये असल्याचं निदर्शनास आणून दिलं. हे दर तर विमान प्रवासाच्या तिकीटाएवढे झाले आहेत.
खाजगी बसेसच्या तिकीट दरांवर नियंत्रण ठेवणारे काही नियम आहेत की नाही, असा सवाल एका युजरने विचारला आहे. ज्यांनी ऐनवेळी बुकिंग ठेवलंय त्यांनी आता काय करायचं, अशी विचारणाही त्याने केली.
दुसऱ्या एका युजरने थेट परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधत, त्यांना या परिस्थितीची कल्पना नाहीये की ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा संतप्त सवाल केला.
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत काम करणाऱ्या नोकरदारांना दिवाळीत आपल्या गावी जाऊन कुटुंबासोबत सण साजरा करायचा असतो, पण या तिकीट दरवाढीमुळे त्यांच्या प्रवासात मोठे अडथळे येत असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुणे RTO ची खाजगी बसेसवर धडक कारवाई
प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींनंतर पुणे RTO ने १ नोव्हेंबरपासून खाजगी बसेसची तपासणी सुरू केली आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
RTO अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की, खाजगी बसेसना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) त्याच श्रेणीतील बसच्या तिकीट दरापेक्षा दीड पटीहून (१.५ पट) जास्त भाडे आकारता येणार नाही.
तसेच, प्रवाशांना दर पाहता यावेत यासाठी बसमध्ये तिकीट दराचा तक्ता लावणे बंधनकारक आहे. नियमापेक्षा जास्त भाडे उकळणाऱ्या बस मालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. ही मोहीम २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहील.
परवाने, प्रवासी क्षमता आणि सुरक्षा उपकरणांचीही तपासणी
या मोहिमेत RTO पथके फक्त तिकीट दरांचीच तपासणी करणार नाहीत. खाजगी बसेसकडे वैध परवाने आहेत का आणि ते क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी तर वाहतूक करत नाहीत ना, याचीही तपासणी केली जाणार आहे. याशिवाय वाहनांमध्ये आवश्यक सुरक्षा उपकरणे आहेत की नाही, हेही अधिकारी पाहतील.
जर तुमच्याकडून जास्त भाडे आकारले जात असेल, तर तुम्ही RTO च्या १८००-२२-०११० या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवू शकता. तक्रार करताना प्रवाशांनी बसचा तपशील आणि तिकिटाचे फोटो शेअर करावेत, असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे. यामुळे दोषींवर कारवाई करणे सोपे होईल.




