बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, वाचा घटनेची संपूर्ण टाइमलाइन

| Published : Sep 24 2024, 08:46 AM IST / Updated: Sep 24 2024, 08:48 AM IST

Badlapur protest
बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, वाचा घटनेची संपूर्ण टाइमलाइन
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Badlapur Case : बदलापूर अत्याचारातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. आरोपीने पोलिसांवरही गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या संपूर्ण घटनेची टाइमलाइन सविस्तर...

Akshay Shinde Encounter : बदलापूरमधील अत्याचाराचे प्रकरण सोमवारी पुन्हा चर्चेत आले. यावेळी आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या एन्काऊंटरवेळी एक पोलीस अधिकारीही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसऱ्या बाजूला एन्काऊंटरवरुन काही प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. विरोधकांनी एन्काऊंटरची न्यायालयिन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. याशिवाय अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी म्हटले की, आमचा मुलगा साधे फटाके फोडू शकत नाही तर बंदूक कसा चालवेल असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. जाणून घेऊया संपूर्ण घटनेची टाइमलाइन सविस्तर...

अल्पवयीन शाळकरी मुलींवर अत्याचार
बदलापुरमधील एका शाळेतील तीन आणि चार वर्षांच्या चिमुरडीवर आरोपीने अत्याचार केले होते. याप्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला एका महिन्याआधी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र SIT कडून केला जात होता. तर काही दिवसांपर्यंत आरोपी SIT च्या रिमांडवर होता. रिमांड संपल्यानंतर SIT ने आरोपीची नवी मुंबईतील तळोजा कारागृहात रवानगी केली. येथूनच एसआयटीकडून अक्षयसंदर्भात अधिक तपास सुरु होता.

तळोजा तुरुंगात बंद होता आरोपी
सोमवारी (23 सप्टेंबर) दुपारच्या वेळेस बदलापुर पोलीस अक्षय शिंदेला अन्य प्रकरणात अटक करण्यासाठी तळोजा तुरुंगात गेली होती. येथून अक्षय शिंदेला ताब्यात घेत बदलापूरच्या दिशेने पोलीस निघाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच दरम्यान अक्षय शिंदेने पोलीस अधिकारी नीलेश मोरे यांची बंदूक हिसकावून घेत त्यांच्यावर गोळीबार केला. अक्षयने नीलेश मोरे यांच्यावर तीन राउंड फायरिंग केली. यामुळे मोरे जखमी झाले. यावेळी मोरे यांच्या बाजूला गाडीत बसलेल्या दुसऱ्या अधिकांऱ्यांनी आपली बंदुक काढली आणि बचावासाठी अक्षय शिंदेवर गोळीबार केला.

पोलीस अधिकाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू
गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला. यानंतर नीलेश मोरे आणि अक्षय शिंदे याला कळव्यातील शिवाजी रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. रुग्णालयात उपचारावेळी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आरोपीच्या मृत्यूची पुष्टी केली. तर नीलेश मोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अक्षय शिंदेला आत्महत्या करायची होती?
सुरुवातीला असे समोर आले की, अक्षय शिंदेला आत्महत्या करायची होती. यामुळेच आरोपीने पोलीस अधिकारी नीलेश मोरे यांची बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांच्या सूत्रांनुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की अक्षय शिंदेला आत्महत्या करायची नव्हती. त्याला पोलिसांच्या तावडीतून सुटायचे होते. यामुळेच आरोपीने पोलीस अधिकारी नीलेश मोरे यांच्यावर गोळीबार केला. यावर दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी बचावासाठी गोळीबार केला असता त्या एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.

अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया
एन्काऊंटरनंतर अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कळव्यातील शिवाजी रुग्णालयातच त्याचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. एन्काऊंटरची माहिती मिळताच अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी जोरजोरात रडण्यास सुरुवात केली. अक्षयच्या आईने थेट पोलिसांवरच आरोप लावले. अक्षयच्या आईने म्हटले की, "माझा मुलगा असे करूच शकत नाही. माझ्या मुलावर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. फटका न फोडू शकणारा मुलगा गोळीबार कसा करू शकतो असाही प्रश्न अक्षयच्या आईने उपस्थितीत केला. आता आम्हालाही मारुन टाका. आम्हालाही जीवंत रहायचे नाही."

न्यायालयिन तपास व्हावा
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. वडेट्टीवार यांनी म्हटले की, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा पुरावे नष्ट करण्यासाठी करण्यात आलाय का? अक्षय शिंदेने खरंच गोळीबार केला? ज्यावेळी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात होता त्यावेळी त्याचे हात बांधलेले नव्हते का? त्याला बंदूक कशी मिळाली? पोलीस एवढे बेजबाबदार कसे असू शकतात? या घटनेबद्दल न्यायालयिन तपास व्हावा अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

आणखी वाचा : 

बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वतःवर झाडल्या गोळ्या, आत्महत्या की एन्काऊंटर?

मर्सिडीज बेंझला पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बजावण्यात आली नोटीस?