सार

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतप्त बदलापुरकरांनी थेट रेल्वे रुळावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

 

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर आता बदलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत. सध्या बदलापुरातील नागरिकांकडून रेलरोको आंदोलन करण्यात येत आहे. तसेच पालकांकडून शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलनही सुरु आहे.

नेमकं संपूर्ण प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरातील एका प्रतिष्ठित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. याच प्रमाणे आणखी एका मुलीसोबतही असाच धक्कादायक प्रकार घडला.

मंगळवारी बदलापूरकरांनी दिली बदलापूर बंदची हाक

याप्रकरणानंतर पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. या पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मंगळवारी बदलापूरकरांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला व्यापारी संघटना, स्कूलबस संघटना आणि रिक्षा संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच पालकांकडूनही बदलापूरच्या शाळेजवळ ठिय्या आंदोलन सुरु आहे.

नागरिकांनी रेल रोको आंदोलन केल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

बदलापूरमधील नागरिकांकडून रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या तासाभरापासून बदलापूरमधील रेल्वे सेवा ठप्प आहे. यामुळे कल्याणपासून–कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक नागरिक रेल्वे रुळावर उतरुन आंदोलनात सहभागी झाले आहेत. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी बदलापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.

भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली प्रतिक्रिया

हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. यावर तातडीने चर्चा करुन संस्थेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच शिक्षणाधिकाऱ्यांनीही या संस्थेची चौकशी करावी, अशा सूचनाही केलेल्या आहेत. या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यावर फास्ट ट्रॅक कारवाई व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा केली होती. त्यांनी ही विनंती मान्य केली आहे. नागरिकांनाही आम्ही शांत राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी संयम ठेवावा. हा गुन्हा निंदनीय आहे. याप्रकरणी आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच पोलिसांनी जर हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. मी सोमवारपासून बाहेर आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी शांत राहावे असे आवाहन मी करत आहे, अशी प्रतिक्रिया बदलापूरचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली.

आणखी वाचा : 

बदलापूर शाळेत लैंगिक अत्याचार, पालकांचा संताप; बदलापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद