Bachchu Kadu: नागपूर खंडपीठाने आंदोलनस्थळ खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. न्यायालयाचा अवमान न करता, त्यांनी प्रशासनाकडे थेट जेलमध्ये व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
नागपूर: प्रहार जनशक्तीचे प्रमुख आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आता एक निर्णायक वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ तातडीने खाली करण्याचे निर्देश दिल्यानंतर, पोलिसांनी लगेच कृती करत आंदोलनस्थळी धाव घेतली. कोर्टाचा हा आदेश मिळाल्यावर बच्चू कडू यांनी आपली ठाम भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, ते न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाहीत, पण त्याच वेळी शेतकऱ्यांसाठीचा लढा थांबवणार नाहीत.
बच्चू कडूंचा नवा निर्धार
"आम्ही इथून उठायला तयार आहोत, पण प्रशासनाने आमची व्यवस्था थेट जेलमध्ये करावी लागेल. आम्ही स्वतःहून जागा सोडणार नाही. पोलिसांना कारवाई करायची असेल तर त्यांनी आम्हाला तत्काळ अटक करावी!"
'शेतकरी मरतोय, तेव्हा कोर्टाला आदेश काढावासा वाटत नाही?'
कोर्टाच्या आदेशावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना बच्चू कडू यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, "एका बातमीवरून लोकांना होणारा त्रास पाहून कोर्टाने जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत, हे आम्हाला मान्य आहे. पण, आमचा शेतकरी दररोज आपले जीवन संपवत आहे. तेव्हा या मरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी न्यायालयाने एकही आदेश काढावासा वाटू नये? शेतकऱ्यांची सुइसाइड थांबावी म्हणून आम्ही आंदोलन करत बसलो, तर एका दिवसात न्यायालय आदेश काढतं कसं? यावर आत्मचिंतन व्हायला हवे."
'लोकशाहीसाठी घातक'
न्यायालयाच्या भूमिकेवर चिंता व्यक्त करत बच्चू कडू म्हणाले, "दिवसेंदिवस हा प्रकार वाढत राहिला, तर लोकशाहीसाठी हे घातक ठरू शकते. एका बातमीवरून न्यायालय आदेश देत असेल, तर आम्ही सर्व मान्य करतो. तुम्ही सांगाल तिथे जायला तयार आहोत, पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांची व्यवस्था जेलमध्ये करा."
राजू शेट्टींची साथ
बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला. "न्यायालयाचा आदेश पाळायचा आणि लढाई सुरू ठेवायची आहे. महाराष्ट्रातील एकही जेल रिकामं राहता कामा नये," असा निर्धार शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला.
'जेल भरो' आंदोलनाची तयारी
बच्चू कडू यांनी पोलिसांना आवाहन केले आहे की, त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि त्यांची व कार्यकर्त्यांची व्यवस्था जेलमध्ये करावी. "आम्ही हात वर करून पोलिसांसमोर सरेंडर होऊ. आता आम्ही पोलिसांची वाट पाहू आणि महाराष्ट्रात 'जेल भरो' आंदोलन करू," अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे. या भूमिकेमुळे आता पुढील कायदेशीर आणि राजकीय घडामोडींना वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.


