- Home
- Mumbai
- Mumbai MHADA Home : म्हाडाची लॉटरी की खिशाला कात्री? घरांचे नवे दर पाहून सामान्यांच्या पायाखालची जमीन सरकेल!
Mumbai MHADA Home : म्हाडाची लॉटरी की खिशाला कात्री? घरांचे नवे दर पाहून सामान्यांच्या पायाखालची जमीन सरकेल!
Mumbai MHADA Home : म्हाडाच्या 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' योजनेतील घरांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली असून, दर ३६ लाखांपासून ते ७.५८ कोटींपर्यंत पोहोचले. या दरवाढीमुळे ताडदेव, जुहूमध्ये अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठी घराचे स्वप्न आवाक्याबाहेर जात आहे.

म्हाडाची लॉटरी की खिशाला कात्री?
मुंबई : मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचं घर घेणं हे अनेक सर्वसामान्यांचं स्वप्न असतं. या स्वप्नासाठी म्हाडाकडे मोठ्या आशेने पाहिलं जातं. मात्र आता म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेतील घरांच्या वाढलेल्या किंमतींमुळे अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न का होतंय दूर?
मुंबई मंडळाने प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत तब्बल 125 घरांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. या नव्या दरांमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. परिणामी, ही घरे आता सर्वसामान्यांच्या आर्थिक कुवतीच्या पलीकडे गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
घरांच्या किमती ऐकून बसेल धक्का
निश्चित करण्यात आलेल्या दरांनुसार घरांच्या किंमती किमान 36 लाख 39 हजार रुपयांपासून थेट 7 कोटी 58 लाख रुपयांपर्यंत आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक घरे दीड कोटी ते साडेसात कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याने मध्यमवर्गीय तसेच अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना केवळ कागदावरची ठरत असल्याचं चित्र आहे.
ताडदेव आणि जुहूतील घरांचे दर पुन्हा वाढले
ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील घरांची किंमत पहिल्या सोडतीत साडेसात कोटी रुपये होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर 2024 मधील सोडतीत हे दर 6 कोटी 77 लाख ते 6 कोटी 82 लाख रुपये इतके कमी करण्यात आले होते. मात्र आता प्रथम प्राधान्य योजनेत या घरांची किंमत पुन्हा वाढवून 7 कोटी 58 लाख रुपये करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे जुहू परिसरातील उच्च उत्पन्न गटातील घरांचे दरही चार कोटींवरून थेट पाच कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपेक्षांवर पाणी?
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही योजना सर्वसामान्यांना दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र वाढत्या किंमतींमुळे ही योजना आता सर्वसामान्यांसाठी स्वप्नाऐवजी दुःस्वप्न ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

