आळंदीमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याशिवाय शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले आहेत.
मुंबई : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश ठिकाणी पुरस्थिती सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे. अशातच सध्या आषाढी वारीला सुरूवात झाली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आज आहे. मात्र आळंदीला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ झाली आङे.

इंद्रायणी नदीला महापूर, चारही पूल पाण्याखाली
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी पुलांवरून वाहत असल्याने आळंदी शहराला जोडणारे चारही मुख्य पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे शहरात प्रवेश करणे मुश्कील झाले आहे.
‘वारकऱ्यांनो, आहात तिथेच थांबा!’
राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या आणि वारकरी आळंदीच्या दिशेने येत आहेत. मात्र प्रशासनाने आळंदीत सध्या येणे सुरक्षित नाही असे म्हटले आहे. ज्या भाविकांनी प्रवास सुरू केलाय त्यांनी तत्काळ थांबवावा अशा सुचना प्रशासनाकडून दिल्या आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर काम करत आहेत. नागरिकांनी आणि भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. तसेच नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांच्या आसपास गर्दी करू नये.
परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पुढील सूचना
सर्व वारकरी आणि नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आणि परिस्थिती सुरक्षित झाल्यानंतरच पुढील अधिकृत सूचना जाहीर करण्यात येणार आहेत.


