पुण्यातील सिलिकॉन बे सोसायटीत एका २४ वर्षीय महिलेने तिच्या पतीवर बाल्कनीतून ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर हुंड्यासाठी त्रास देत असल्याचेही तिने सांगितले. पतीसह कुटुंबातील सहा जण फरार असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घरगुती हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पुणे शहरातून एका धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. वडगाव शेरी येथील सिलिकॉन बे सोसायटीतील २४ वर्षीय महिलेने तिच्या पतीवर आरोप केला आहे. तिच्या पतीने तिला बाल्कनीतून ढकलण्याचा प्रयत्न केला पण ती थोडक्यात बचावली. ही घटना २५ जूनच्या रात्री घडली असून पतीसह कुटुंबातील ६ लोक फरार झाले आहेत.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

चंदननगर पोलिसांनी पती आणि सहा जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी वडगाव शेरी आणि कल्याणीनगर येथील राहणार आहेत. एप्रिल २०२३ मध्ये पीडितेचे लग्न माहेरकडच्या लोकांनी मोठ्या थाटामाटात केलं होत. त्यावेळी विवाहितेच्या वडिलांनी रोख रक्कम, दागिने आणि घरातील वस्तूंवर २५ लाख रुपये खर्च केले होते. सासरकडच्या लोकांकडून विवाहितेला त्रास देणं सुरूच होतं. लग्नानंतर ५० लाख रुपये देऊनही हा त्रास देणं सुरुच होत.

विवाहितेच्या हत्येचा केला प्रयत्न 

२७ मे रोजी २०२५ आरोपी पतीने पत्नीचा गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पुढच्या महिन्यात परत वादाला सुरुवात झाली. २५ जून रोजी रात्री ११:३० च्या सुमारास, जेवण मागवण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादामुळे भांडण वाढत गेलं. त्यानं त्याच्या बायकोचे केस ओढले, फोन फोडला आणि बाल्कनीत ओढून तिला खाली ढकलण्याचा प्रयत्न केला.

शेजारच्या लोकांनी आणि चौकीदाराने आवाज ऐकल्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे. चौकीदाराने तिच्या वडिलांना कॉल केला आणि घरचे तिला घेऊन गेले. त्यानंतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा तपास करण्यासाठी तीन विशेष पथके रवाना करण्यात आले आहेत. सोसायटीचे वॉचमन आणि रहिवाशांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

लग्न करताना विचार करण्याची गरज 

काही महिन्यांपूर्वी वैष्णवी हगवणे प्रकरण आपल्याला माहित असेल, त्या प्रकरणात वैष्णवीच लग्न मोठ्या थाटामाटात करण्यात आलं होत. वैष्णवीचा खून हगवणे कुटुंबाकडून करण्यात आला असा आरोप कस्पटे यांनी केला. त्यामुळे आपण लग्न करताना नवरा कसा आहे, त्याच कुटुंब कस आहे याची माहिती घेऊनच लग्न करायला हवी.