Winter Travel: थंडीत कुडकुडण्यापेक्षा एखाद्या उबदार, शांत आणि समुद्रकिनाऱ्यावर सुट्ट्या घालवायच्या आहेत? मग गोवा, केरळचं वरकला, अंदमान, कर्नाटकातलं हंपी आणि पुद्दुचेरी या ५ सुंदर पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.
हिवाळ्यातील प्रवासासाठी उबदार पर्याय
हिवाळा सुरू झाला की बहुतेकांना बर्फवृष्टी आणि कडाक्याची थंडी एन्जॉय करायला आवडते. पण सगळ्यांनाच थंडी आवडते असं नाही. काहींना थंडी सुरू होताच अनेक त्रास सुरू होतात. त्यामुळे अशी लोकं उबदार आणि शांत वातावरण असलेल्या ठिकाणी जाण्याचा विचार करतात. तुम्हीही हिवाळ्यात आल्हाददायक ऊन, समुद्रकिनाऱ्यावरील शांतता आणि उबदार वातावरणात प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही आहेत काही सुंदर ठिकाणं.
गोव्याला जाण्याचा प्लॅन करा
हिवाळ्यात उबदार वातावरण, समुद्राच्या लाटा आणि बीचवर बसून ऊन खाण्याची मज्जा घ्यायची असेल, तर गोवा तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान इथलं हवामान प्रवासासाठी एकदम भारी असतं. डिसेंबर आणि जानेवारीत तर इथलं वातावरण आणखीनच खास असतं. इथले बागा, कलंगुट, अंजुना आणि पाळोळे बीच पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.
वरकला, केरळ
समुद्रकिनाऱ्याच्या शांत वातावरणासोबतच उबदार हवामान हवं असेल, तर केरळचं वरकला हे प्रवासासाठी एक उत्तम ठिकाण आहे. इथले समुद्राजवळील उंच कडे, सुंदर कॅफे आणि दूरवर पसरलेल्या निळ्या समुद्राची दृश्यं पर्यटकांना आकर्षित करतात. हिवाळ्यात इथलं हवामान सहसा आल्हाददायक आणि उबदार असतं. वरकला बीचसोबतच इथला नॉर्थ क्लिफ आणि साऊथ क्लिफ देखील फिरण्यासाठी मस्त ठिकाणं आहेत.
अंदमान आणि निकोबार बेटे
हिवाळ्यात निळा समुद्र, पांढरी वाळू आणि उबदार ऊन तुमचं स्वागत करेल अशा ठिकाणी जायचं असेल, तर तुम्ही अंदमान आणि निकोबार बेटांचा तुमच्या प्रवासाच्या यादीत समावेश करू शकता. हिवाळ्यात इथलं वातावरण सहसा उबदार असतं. हॅवलॉक बेट, नील बेट आणि राधानगर बीच ही इथली सुंदर पर्यटन स्थळं आहेत.
हंपी, कर्नाटक
तुम्हाला समुद्रापेक्षा इतिहास आणि मोकळ्या आकाशाखाली फिरायला आवडत असेल, तर कर्नाटकातलं हंपी हा एक उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यात इथलं वातावरण सहसा आल्हाददायक असतं. दिवसा उन्हात ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा एक वेगळाच अनुभव मिळतो. हंपी इथल्या प्राचीन मंदिरांसाठी आणि दगडांनी बनवलेल्या अद्वितीय वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही विरुपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, दगडी रथ आणि मतंग टेकडी यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
पाँडिचेरी
हिवाळ्यात उबदार ऊन आणि शांत वातावरणात सुट्ट्या घालवण्यासाठी पाँडिचेरी हे देखील एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. इथली फ्रेंच वास्तुकला, रंगीबेरंगी रस्ते, समुद्रकिनाऱ्यावरील कॅफे आणि सुंदर किनारे तुम्हाला प्रवासाचा एक वेगळाच अनुभव देतील. पाँडिचेरीमध्ये तुम्ही सकाळी प्रोमेनेड बीचवर फेरफटका मारू शकता. यासोबतच पॅराडाईज बीच आणि सेरेनिटी बीच हे देखील फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. इथल्या फ्रेंच कॉलनीत पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या सुंदर इमारती पाहायला मिळतात. सोबतच तुम्ही ऑरोव्हिललाही भेट देऊ शकता.
















