रात्री केस धुण्याची सवय अनेकांना असते. पण केस पूर्ण न सुकवता झोपल्यास केसांचे मोठे नुकसान होऊ शकते. केसगळती आणि कोंड्याचा त्रास टाळायचा असेल, तर ही छोटीशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना रात्री केस धुण्याची सवय असते. केस नीट न सुकवताच आपण थेट झोपायला जातो. 'ओल्या केसांनी झोपू नकोस, सर्दी-ताप येईल' असं घरातील मोठी माणसं नेहमी सांगतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ओल्या केसांमुळे थेट सर्दी किंवा ताप येतो, याचा कोणताही भक्कम पुरावा विज्ञानाकडे नाही. तरीही, केस धुतल्यानंतर ते न सुकवता झोपणे, हे तुमच्या केसांच्या आणि टाळूच्या (scalp) आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही.

ओल्या केसांनी झोपल्यावर नेमकं काय होतं?

याचं पहिलं कारण म्हणजे केसांचा नैसर्गिक पोत. केस जेव्हा ओले असतात, तेव्हा ते नेहमीपेक्षा जास्त कमकुवत होतात. अशा वेळी जर तुम्ही केस विंचरले, ओढले किंवा त्यांना जास्त घर्षण (friction) झालं, तर ते सहज तुटू शकतात.

रात्री झोपताना आपण साहजिकच कुशीवर वळतो. यावेळी तुमचे ओले केस उशीवर सतत घासले जातात. केस आधीच कमकुवत झालेले असतात, त्यामुळे या सततच्या घर्षणामुळे केस तुटण्याची किंवा त्यांना फाटे फुटण्याची शक्यता खूप वाढते. ज्यांचे केस लांब आहेत किंवा ज्यांचे केस लवकर तुटतात, त्यांनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.

या सवयीचा परिणाम फक्त केसांवरच नाही, तर तुमच्या टाळूवरही होतो. केस आणि टाळू जास्त वेळ ओले राहिल्यास तिथे दमट वातावरण तयार होतं. अशा वातावरणात बॅक्टेरिया आणि यीस्टची वाढ वेगाने होते. याचा परिणाम म्हणून, काही लोकांना कोंडा वाढण्याची किंवा टाळूला सूज येण्याची समस्या जाणवू शकते. अर्थात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त एक रात्र ओल्या केसांनी झोपलात आणि लगेच इन्फेक्शन होईल.

ओले केस घट्ट बांधण्याची चूक

ओले केस घट्ट बांधून झोपणे, ही आणखी एक मोठी चूक आहे. काही जण केस धुतल्या धुतल्या घट्ट वेणी घालतात, अंबाडा बांधतात किंवा रबर बँड लावतात. ओले असताना केस घट्ट बांधल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडतो. या सवयीमुळे केस तुटण्याचं प्रमाण खूप वाढतं.

मग केस धुतल्यानंतर ते योग्य प्रकारे कसे सुकवावेत? केस टॉवेलने जोरात घासण्याऐवजी, ते हलक्या हाताने दाबून पाणी टिपून घ्या. शक्य असेल तर केस नैसर्गिकरित्या सुकू द्या. जर तुम्हाला घाई असेल, तर तुम्ही हेअर ड्रायर वापरू शकता. पण ड्रायरची गरम हवा थेट केसांवर मारण्याऐवजी, तापमान कमी ठेवा किंवा 'कूल एअर' सेटिंग वापरा. जास्त उष्णतेमुळेही केसांचं नुकसान होऊ शकतं.

थोडक्यात सांगायचं तर, ओल्या केसांनी झोपल्यामुळे सर्दी होते, या जुन्या समजुतीवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याची गरज नाही. पण ओले केस कमकुवत असल्यामुळे उशीशी होणारे घर्षण, केस घट्ट बांधणे आणि जास्त वेळ राहणारा ओलावा यामुळे तुमचे केस आणि टाळू नक्कीच खराब होऊ शकतात. जर तुम्ही रात्री केस धुत असाल, तर झोपण्यापूर्वी ते जास्तीत जास्त सुकवण्याचा प्रयत्न करा. ही छोटीशी काळजी घेतल्यास तुमचे केस नक्कीच निरोगी राहतील.