'लाऊड लुकिंग' नेमकं आहे तरी काय? नावावरूनच त्याचा अर्थ बऱ्यापैकी स्पष्ट होतो. 'लाऊड लुकिंग' म्हणजे तुम्हाला एखाद्या रिलेशनशिपमध्ये यायचंय, हे खुलेपणाने व्यक्त करणं. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, हा साधा विचार संवादाचा सूरच बदलून टाकतो.

आजकाल प्रेम, डेटिंग, रिलेशनशिप या सगळ्याचे अर्थच बदलून गेलेत. सिच्युएशनशिप, बेंचिंग, घोस्टिंग यांसारखे शब्द आता प्रेमाच्या डिक्शनरीचा भाग झालेत. आणि आता या यादीत नवीन भर पडलीय ती— ‘लाऊड लुकिंग’ची. इन्स्टाग्राम, डेटिंग ॲप्सवर सध्या हाच शब्द ट्रेंड करतोय. पण हे ‘लाऊड लुकिंग’ म्हणजे नेमकं काय?

नावावरूनच त्याचा अर्थ बऱ्यापैकी क्लिअर होतो. ‘लाऊड लुकिंग’ म्हणजे तुम्हाला रिलेशनशिपमध्ये यायचंय, हे खुलेपणाने, ठामपणे सांगणं. लपाछपी न करता, थेट बोलणं.

जो व्यक्ती हा मार्ग निवडतो, तो ‘कॅज्युअल डेटिंग’चं नाटक करत नाही किंवा गोलमाल मेसेजच्या आडून आपला हेतू लपवत नाही. तो थेट सांगतो की त्याला काय हवंय.

याचा अर्थ पहिल्या डेटवरच लग्न का?

अजिबात नाही. याचा अर्थ असा नाही की पहिल्याच डेटवर लग्नाचं प्लॅनिंग करायचंय किंवा पार्टनरवर प्रेशर टाकायचंय.

उलट याचा अर्थ प्रामाणिकपणा असा होतो. ‘बघू काय होतंय’, ‘मी आत्ता काहीच विचार करत नाहीये, जस्ट चिल करूया’— असा गोंधळ न निर्माण करता थेट सांगणं, ‘मला योग्य व्यक्ती भेटली तर एका सीरियस रिलेशनशिपमध्ये जायचंय. मला टाईमपास करायचा नाहीये.’

हा ट्रेंड का लोकप्रिय होतोय?

मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, विचारांमधील हा छोटासा बदल संवादाची दिशाच बदलून टाकतो.

१. वेळ वाया जाण्यापासून वाचवतो: आजकाल बरेच जण महिनोनमहिने ‘कॅज्युअल’ म्हणून नातं ओढत नेतात, पण सीरियस होत नाहीत. लाऊड लुकिंग सुरुवातीलाच क्लिअर करतं की दोघांचं टार्गेट एकच आहे की नाही.

२. मानसिक शांती: तुम्हाला काय हवंय हे स्पष्ट सांगितल्यास विनाकारण ‘तो/ती काय विचार करतोय’, ‘हे खरंच नातं आहे का’— अशा प्रकारचं टेन्शन कमी होतं.

३. योग्य व्यक्ती शोधणं सोपं जातं: जेव्हा तुम्ही खुलेपणाने सांगता की तुम्ही एक हेल्दी, सीरियस रिलेशनशिप शोधत आहात, तेव्हा जे फक्त टाईमपास करायला आलेत, ते आपोआप बाजूला होतात. आणि जे तुमच्यासारखाच विचार करत आहेत, ते जवळ येतात.

तज्ज्ञांच्या मते, लाऊड लुकिंग म्हणजे डेस्परेट होऊन प्रेम शोधणं नाही. याचा अर्थ आपल्या अपेक्षांबद्दल लाज न बाळगणं आणि त्या आत्मविश्वासाने व्यक्त करणं असा होतो. त्यामुळे पुढच्या वेळी कोणी विचारलं ‘काय शोधतोयस/शोधतेयस’, तर गोलमाल न बोलता खरं तेच सांगा.