- Home
- lifestyle
- Digestion Time : आपण जे अन्न खातो ते पचायला किती वेळ लागतो? अन्न न पचताच पुन्हा भूक लागते का?
Digestion Time : आपण जे अन्न खातो ते पचायला किती वेळ लागतो? अन्न न पचताच पुन्हा भूक लागते का?
Digestion Time : आपण रोज सकाळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो. पण आपण खाल्लेलं अन्न किती वेळात पचतं? ते पूर्णपणे पचण्याआधीच पुन्हा भूक लागते का? पचनसंस्थेत नक्की काय घडतं?

आपण खाल्लेलं अन्न पचायला किती वेळ लागतो?
माणसानं निरोगी राहण्यासाठी चांगलं अन्न खाणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते अन्न व्यवस्थित पचणंही महत्त्वाचं आहे. आपण रोज सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी स्नॅक्स आणि रात्री डिनर असं वेगवेगळ्या प्रकारचं अन्न घेतो. पण आपण खाल्लेलं अन्न पोटात गेल्यावर काय होतं? ते पूर्णपणे पचायला किती वेळ लागतो? भात खाल्ला तर लवकर पचतो का? नॉनव्हेज खाल्ल्यावर जास्त वेळ लागतो का? खाल्लेलं अन्न पचण्याआधीच पुन्हा भूक लागते का? असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात.

अन्न कसं पचतं?
तज्ज्ञांच्या मते.. आपण अन्न खातो तेव्हाच पचनक्रिया सुरू होते. सगळ्यात आधी आपण दातांनी अन्न चावतो तेव्हा लाळेतले एन्झाइम्स अन्नातल्या पिष्टमय पदार्थांचं विघटन करायला सुरुवात करतात. त्यानंतर अन्न अन्ननलिकेतून पोटात जातं. तिथं पाचक रस आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड अन्नाचे आणखी छोटे तुकडे करतात. विशेषतः प्रथिनांचं पचन इथंच सुरू होतं. त्यानंतर अन्न लहान आतड्यात जातं. तिथं पित्त आणि स्वादुपिंडातून बाहेर पडणारे एन्झाइम्स अन्नाचं आणखी पचन करतात.
कोणतं अन्न पचायला किती वेळ लागतो?
आपण खात असलेलं प्रत्येक अन्न एकाच वेळी पचत नाही. तज्ज्ञांच्या मते, एखादा पदार्थ पूर्णपणे पचायला २४ ते ७२ तास लागू शकतात. फळं, भाज्या, भात, डाळी, मांसाहार अशा प्रत्येक अन्नाची पचनक्रिया वेगळी असते. साधारणपणे पाणी पोटातून लवकर बाहेर पडतं. पण घनपदार्थांना जास्त वेळ लागतो. कलिंगड, पपई यांसारखी फळं लवकर पचणाऱ्या अन्नात येतात. पण फळांमधलं फायबर आणि ते इतर अन्नासोबत खाल्ल्यामुळं पचनाला लागणारा वेळ बदलू शकतो.
भात, इडली, उपमा यांसारखे कार्बोहायड्रेट्स जास्त असलेले पदार्थ साधारणपणे पोटातून लहान आतड्यात जायला काही तास लागतात. डाळी, चणे, राजमा यांसारखे प्रथिनं आणि फायबर जास्त असलेले पदार्थ पचायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. अंडी, मासे, चिकन, मटण यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ पचायलाही ते बनवण्याची पद्धत, चरबीचं प्रमाण आणि आकारमानानुसार वेगवेगळा वेळ लागतो.
अन्न न पचताच भूक लागते का?
साधारणपणे जेवल्यानंतर दोन-तीन तासांनीच आपल्याला पुन्हा भूक लागते. तेव्हा आपल्याला वाटतं की आपण खाल्लेलं अन्न पूर्णपणे पचलंय. पण हे खरं नाही. अन्न पूर्णपणे पचण्याआधीच आपल्याला भूक लागू शकते. कारण भूक लागणं हे केवळ पोट रिकामं होण्यावर अवलंबून नसतं. आपल्या शरीरातले हार्मोन्स, रक्तातली साखरेची पातळी, अन्नातले पोषक घटक, झोप आणि शारीरिक श्रम यांसारख्या गोष्टींचाही भुकेवर परिणाम होतो.
लवकर भूक लागू नये म्हणून काय करावं?
जेवल्यानंतर लगेच पुन्हा भूक लागत असेल तर खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष दिलं पाहिजे. रोजच्या जेवणात डाळी, पालेभाज्या, फळभाज्या, फळं आणि पुरेसं प्रथिनं असतील याची काळजी घेतली पाहिजे. फायबर जास्त असलेलं अन्न खाल्ल्यानं पचनाला मदत होतेच, शिवाय पोट भरलेलं असल्यासारखं जास्त वेळ वाटतं. तसंच अंडी, डाळी, दही यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ जेवणात समाविष्ट करता येतील. पुरेसं पाणी पिणंही महत्त्वाचं आहे.

