Liver Health : यकृत निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात घ्या या 5 गोष्टी
यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. फॅटी लिव्हरसारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि यकृताचे आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार अत्यंत आवश्यक आहे. लसूण, दही यांसारखे ५ पदार्थ यकृत मजबूत ठेवण्यास कशी मदत करतात ते जाणून घ्या.

वयानुसार यकृत मजबूत कसे ठेवावे?
यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. सध्याच्या काळात फॅटी लिव्हरची समस्या वेगाने वाढताना दिसत आहे. अनेक जण यावर औषधे घेतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात ५ खास पदार्थांचा समावेश केल्यास यकृत दीर्घकाळ निरोगी राहू शकते.

लसूण :
लसणामध्ये सल्फरचे प्रमाण मुबलक असते. हे घटक यकृतातील एन्झाईम्स सक्रिय करतात. लसूण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास यकृताला मदत करतो. दररोज सकाळी उपाशी पोटी १-२ पाकळ्या कच्चा लसूण कोमट पाण्यासोबत खाणे फायदेशीर ठरते.
हळद :
हळदीमध्ये कुर्क्युमिन नावाचा महत्त्वाचा घटक असतो. हळदीमधील अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म यकृताच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि यकृताचे कार्य सुधारतात.
दही आणि ताक :
फॅटी लिव्हरची समस्या असलेल्या लोकांसाठी दही आणि ताक खूप उपयुक्त आहे. जेवणासोबत याचे सेवन केल्याने पचन सुधारते. मात्र पॅकेटऐवजी घरी बनवलेल्या ताज्या दह्याला प्राधान्य द्यावे.
हिरव्या पालेभाज्या आणि भाज्या :
पालक, कोबी, ब्रोकोली आणि फ्लॉवर यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. या भाज्या यकृतावरील ताण कमी करतात. तुम्ही सॅलड, सूप किंवा वाफवलेल्या भाज्यांच्या रूपात यांचा आहारात समावेश करू शकता.
कॉफी :
फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्यांसाठी कॉफी पिणे फायदेशीर ठरू शकते. बिनसाखरेची ब्लॅक कॉफी मर्यादित प्रमाणात प्यायल्याने यकृताचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

