- Home
- lifestyle
- Stomach Bloating Relief : जेवल्यानंतर पोट फुगतंय का? तज्ज्ञांनी सांगितलेल्या या 4 टिप्स नक्की फॉलो करा
Stomach Bloating Relief : जेवल्यानंतर पोट फुगतंय का? तज्ज्ञांनी सांगितलेल्या या 4 टिप्स नक्की फॉलो करा
जास्त जेवल्यानंतर पोट फुगण्याची समस्या अनेकांना सतावते. आपण एकाच वेळी भरपूर जेवतो, तेव्हा पोटाचा आकार वाढतो. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटात मोठ्या प्रमाणात गॅस तयार होतो.

हेवी जेवण कसं पचवायचं?
लग्न किंवा पार्टीत मनसोक्त जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. गरजेपेक्षा जास्त खाणं, घाईघाईत जेवणं, गॅस वाढवणारे पदार्थ खाणं किंवा पचनाच्या समस्येमुळे हा त्रास होतो. पोट फुगल्याने कोणताही मोठा धोका नसला, तरी त्यामुळे आपली रोजची कामं करणं कठीण होतं.
विशेषतः जास्त फॅट्स, मीठ किंवा मैद्यासारखे पदार्थ पचनसंस्थेवर ताण आणतात. आपण एकाच वेळी भरपूर जेवतो, तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि पोट फुगणे, गॅस, अपचन यांसारख्या समस्या सुरू होतात.

जास्त जेवल्यावर पोटात नेमकं काय होतं?
बंगळुरूच्या सायटकेअर हॉस्पिटलचे गॅस्ट्रोइंटेस्टायनल सर्जरीचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. आदित्य व्ही. नरगुंड याबद्दल सविस्तर माहिती देतात. ते सांगतात की, पोटाच्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्यावर पोट फुगतं. जास्त जेवल्यामुळे अन्नाला जागा करून देण्यासाठी पोटाचा आकार वाढतो.
पोटाचा आकार वाढल्यामुळे अन्न पुढे ढकलण्याचा वेग कमी होतो. यामुळे अन्न जास्त वेळ पोटातच राहतं. पचनक्रिया मंदावल्यामुळे एन्झाइम्स आणि आतड्यातील बॅक्टेरिया अन्नाचं विघटन करताना मोठ्या प्रमाणात गॅस तयार करतात.
पोट फुगण्याची समस्या कशी टाळावी?
पार्टीतल्या जेवणात फॅट्स आणि मीठ जास्त असतं. फॅट्सयुक्त पदार्थांमुळे पचनक्रिया आणखी मंदावते. याशिवाय, अनेक जण चविष्ट जेवण घाईघाईत खातात. यावेळी अन्नासोबत हवाही पोटात जाते. पोटाचा आकार वाढणं, पचनक्रिया मंदावणं आणि पोटात अडकलेला गॅस या तिन्ही गोष्टींमुळे पोट खूप फुगतं आणि जडपणा जाणवतो.
डॉक्टरांनी सांगितलेल्या ४ महत्त्वाच्या सवयी
१. हेवी जेवणाआधी हलका आहार घ्या:
जास्त जेवण्याआधी थोड्या प्रमाणात फायबरयुक्त भाज्या, सूप किंवा सॅलड खा. यामुळे पचनसंस्था तयार होते आणि तुम्ही घाईघाईत जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाणं टाळता.
२. सावकाश आणि चावून खा:
अन्न सावकाश खाणं हा पोट फुगणे टाळण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. अन्न चावून खाल्ल्याने त्याचे बारीक तुकडे होतात आणि पचनाचे एन्झाइम्स वेगाने काम करतात. सावकाश जेवल्याने पोटात हवा जाण्याचं प्रमाणही कमी होतं.
३. जेवताना सोडा किंवा कोल्ड्रिंक्स टाळा:
कार्बोनेटेड पेयांमुळे आतड्यात गॅस वाढतो. त्यामुळे जेवताना सोडा पिणं पूर्णपणे टाळा. गरज वाटल्यास फक्त थोडं पाणी प्या.
४. जेवल्यानंतर थोडं चाला:
हेवी जेवणानंतर लगेच झोपू नका किंवा बसून राहू नका. १० ते १५ मिनिटे सावकाश चालल्याने पचनक्रिया सुधारते. या हालचालीमुळे अन्न सहज पुढे सरकतं आणि गॅसचा त्रास कमी होतो.

