- Home
- lifestyle
- Street Food : हे 6 स्ट्रीट फूड्स आरोग्य बिघडवत नाहीत, डॉक्टरांनीच दिली महत्त्वाची माहिती
Street Food : हे 6 स्ट्रीट फूड्स आरोग्य बिघडवत नाहीत, डॉक्टरांनीच दिली महत्त्वाची माहिती
Healthy Street Food: बाहेरचं स्ट्रीट फूड खाल्लं की प्रकृती बिघडतेच असं मुळीच नाही. योग्य पद्धतीने आणि स्वच्छतेने बनवलेले काही पदार्थ शरीराला उत्तम पोषण देतात. चला तर मग, डॉक्टरांच्या मते कोणते स्ट्रीट फूड्स आपण बिनधास्त खाऊ शकतो ते पाहूया.

हेल्दी स्ट्रीट फूड्सची यादी
स्ट्रीट फूडचे नाव निघताच हे पदार्थ आरोग्याला हानी पोहोचवतील असा विचार अनेकजण करतात. पण सगळेच स्ट्रीट फूड्स वाईट नसतात. स्वच्छ ठिकाणी बनवलेले आणि योग्य घटकांचा वापर केलेले पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात. डॉक्टरांनीच अशा काही हेल्दी स्ट्रीट फूड्सची यादी शेअर केली आहे.

भेळपुरी
गाड्यांवर मिळणारी भेळ कुरमुरे, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि लिंबाचा रस वापरून बनवतात. डॉ. शुभम वत्स यांच्या मते, कुरमुऱ्यांमधील कार्बोहायड्रेट्स शरीराला झटपट ऊर्जा देतात. यामध्ये शेव आणि मिठाचे प्रमाण कमी ठेवल्यास ही भेळ अधिक पौष्टिक बनते.
इडली सांबार
इडली वाफेवर शिजवत असल्यामुळे यात तेलाचा वापर अजिबात होत नाही. सांबारमधील डाळींमधून प्रथिनांचा पुरवठा होतो आणि भाज्यांमुळे फायबर मिळते. इडली खाताना भरपूर सांबार घेतल्यास शरीराला जास्त पोषक तत्वे मिळतात.
मोड आलेली कडधान्ये
मोड आलेली कडधान्ये आणि हरभऱ्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि इतर अनेक पोषक घटक भरपूर असतात. कांदा, टोमॅटो, काकडी, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घातल्यामुळे या चाटची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढते.
भाजलेला मका
कोळशावर भाजलेले मक्याचे कणीस खाणे हा अत्यंत आरोग्यदायी पर्याय आहे. मक्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. लिंबाचा रस आणि हलके मसाले लावून हे कणीस आवडीने खाता येते.
फ्रूट चाट
पेरू, डाळिंब, सफरचंद आणि केळी यांसारखी मोसमी ताजी फळे एकत्र करून फ्रूट चाट बनवता येते. त्यावर थोडे सैंधव मीठ आणि लिंबाचा रस टाकल्यास चव छान येते. फळांमधील नैसर्गिक जीवनसत्त्वे शरीराला निरोगी ठेवतात.
उकडलेलं अंड, ऑम्लेट
रस्त्यावरील गाड्यांवर मिळणारी उकडलेली अंडी आणि ऑम्लेट हे प्रथिनांचे उत्तम स्त्रोत आहेत. हे खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी मदत होते. बनवताना कमीत कमी तेलाचा वापर केलेले ऑम्लेट निवडणे जास्त योग्य ठरते.
टीप - स्ट्रीट फूड खाताना नेहमी स्वच्छता, अन्नाचा ताजेपणा आणि ते बनवण्याच्या पद्धतीकडे विशेष लक्ष द्या.

