तुमच्याकडे असलेलं एक्सपायर झालेलं लोशन फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा अनेक स्मार्ट कामांसाठी वापर करू शकता. फर्निचर चमकवण्यासाठी, चामड्याच्या वस्तू साफ करण्यासाठी, बॅगची चेन मोकळी करण्यासाठी आणि दरवाज्यांचा करकर आवाज घालवण्यासाठी हे लोशन खूप उपयोगी ठरतं. यामुळे वस्तू वाया जात नाहीत आणि पैसेही वाचतात.
Expired Beauty Products Reuse: आपल्यापैकी अनेकांना लोशनच्या मोठ्या बाटल्या घरात साठवून ठेवायला आवडतं. कारण थंडी असो वा उन्हाळा, हाता-पायांना लावण्यासाठी लोशन लागतंच. त्यामुळे आपण अनेकदा मोठ्या साईझच्या बाटल्या विकत घेतो. त्यात मॉलमध्ये किंवा ऑनलाइन 'Buy One, Get One Free' सारखी ऑफर दिसली की, आपण लगेच दोन बाटल्या उचलतो. पण या नादात आपण अनेकदा एक्सपायरी डेट बघायलाच विसरतो आणि पैसे वाचवण्याचा हा प्रयत्न आपल्याला महागात पडतो.
एक्सपायर झालेलं लोशन त्वचेवर वापरल्यास ॲलर्जी, खाज, पुरळ किंवा पिंपल्ससारख्या समस्या होऊ शकतात. पण म्हणून लोशनची पूर्ण बाटली फेकून देण्यापेक्षा, तुम्ही काही स्मार्ट पद्धतींनी त्याचा योग्य वापर करू शकता. चला तर मग, या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्सबद्दल जाणून घेऊया.
एक्सपायर झालेलं लोशन पुन्हा कसं वापरायचं?
फर्निचर पॉलिश म्हणून
तुम्ही तुमच्या घरातल्या लाकडी फर्निचरला चमकवण्यासाठी या लोशनचा वापर करू शकता. लोशनचा टेक्स्चर क्रीमी असल्यामुळे ते लाकडावर एक संरक्षक थर तयार करतं. यामुळे फर्निचरला नैसर्गिक चमक येते आणि ते स्वच्छही दिसतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोशन जास्त लावू नका, नाहीतर फर्निचर चिकट होऊ शकतं.
चामड्याच्या वस्तू साफ करण्यासाठी
चामड्याच्या वस्तू, जसं की बूट, सँडल, बॅग किंवा हिल्स यांना पॉलिश करण्यासाठी आणि मऊ बनवण्यासाठी तुम्ही एक्सपायर झालेल्या लोशनचा वापर करू शकता. लोशनमधील मॉइश्चरमुळे चामड्याच्या वस्तूंना एक नवी चमक मिळते. यासाठी जास्त मेहनत न घेता वस्तू स्वच्छ आणि चमकदार दिसू लागतात.
अडकलेली चेन मोकळी करा
अनेकदा बॅगची किंवा कपड्यांची चेन अडकते. अशावेळी तुम्ही त्या चेनवर थोडंसं लोशन लावू शकता. यामुळे चेन लगेच मोकळी होते. फक्त एक काळजी घ्या की, लोशन कपड्यांवर लागणार नाही.
दरवाज्यांसाठी
घरातल्या दरवाज्यांच्या बिजागऱ्यांमधून अनेकदा करकर आवाज येतो किंवा कडी नीट लागत नाही. अशावेळी त्या बिजागऱ्यांवर किंवा कडीवर थोडं लोशन लावा. यामुळे आवाज येणं बंद होईल आणि दार सहजपणे लागेल.


