सॅमसंग लवकरच, कदाचित या महिन्यात किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला, Galaxy S25 FE लाँच करण्याची तयारी करत आहे. या फोनमध्ये स्लिम डिझाइन, अपग्रेडेड कॅमेरा, मोठी बॅटरी, जलद चार्जिंग आणि शक्तिशाली Exynos 2400 चिप असण्याची शक्यता आहे.
मुंबई - सॅमसंगने जानेवारी 2025 मध्ये आपली Galaxy S25 सिरीज सादर केली होती. आता कोरियन टेक जायंट त्यांच्या फ्लॅगशिप लाइनअपमधील Fan Edition म्हणजेच Galaxy S25 FE रिलीज करण्याच्या तयारीत असल्याच्या अफवा जोर धरू लागल्या आहेत. या स्मार्टफोनच्या रंग, किमती आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन्सबाबतची माहिती लीक झाल्यामुळे लॉन्चिंगपूर्वीच तांत्रिक जगतात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सॅमसंगने जरी अधिकृतपणे तारीख जाहीर केली नसली, तरी Galaxy S24 FE मागील वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज झाला होता. यंदा मात्र कंपनी फॅन एडिशन फोन अधिक लवकर, म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला लॉन्च करू शकते, असे संकेत मिळत आहेत.
Galaxy S25 FE: काय अपेक्षित आहे?
Android Headlines या तंत्रज्ञान पोर्टलने Galaxy S25 FE ची संपूर्ण स्पेसिफिकेशन शीट लीक केली आहे. त्यानुसार, हा फोन १६१.३ x ७६.६ x ७.४ मिमी आकाराचा असेल – म्हणजेच मागील मॉडेलपेक्षा अधिक पातळ (फक्त ७.४ मिमी) असेल.
यामध्ये ६.७ इंचांचा FHD+ रिझोल्यूशन असलेला Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असून, त्याचा रिफ्रेश रेट १२०Hz असेल. हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास व्हिक्टसने संरक्षित असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे फोन अधिक टिकाऊ होईल.
कॅमेरा सेटअप आणि परफॉर्मन्स
फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार असून त्यात:
५०MP प्रायमरी कॅमेरा (OIS सह),
१२MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा,
८MP ३x टेलिफोटो कॅमेरा
असे कॉन्फिगरेशन असेल. सेल्फीसाठी यावेळी १२MP फ्रंट कॅमेरा असणार आहे, जो मागील १०MP पेक्षा सुधारित असेल.
बॅटरी आणि चार्जिंग
Galaxy S25 FE मध्ये ४,९००mAh क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे – जी S24 FE च्या ४,७००mAh बॅटरीपेक्षा थोडी मोठी आहे. चार्जिंग स्पीड २५W वरून ४५W पर्यंत वाढवण्यात आल्याचे कळते. याशिवाय, १५W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील असणार आहे.
प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर
या डिव्हाइसला Exynos 2400 प्रोसेसर देण्यात येणार असून, तो S24 FE मधील Exynos 2400e पेक्षा अधिक ताकदवान असेल. Galaxy S25 FE मध्ये दोन स्टोरेज पर्याय असतील – ८GB RAM + १२८GB आणि ८GB RAM + २५६GB.
फोन Android 16 आधारित One UI 8 वर चालेल. सॅमसंगने याआधी Galaxy S24 सिरीजसाठी ७ वर्षांचे OS अपडेट्स आणि सुरक्षा फिक्सेसची हमी दिली होती, त्यामुळे S25 FE सुद्धा त्याच धोरणात येण्याची शक्यता आहे.


