नवरात्रीत देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी काही सोपी रेसिपी शोधताय? मग खोबरं, दूध, साखर आणि वेलची वापरून बनवलेले हे झटपट कोकोनट लाडू नक्की ट्राय करा. फक्त १० मिनिटांत तयार होणाऱ्या या लाडूंची सोपी रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

नवरात्रीता सण म्हणजे भक्ती, उत्साह आणि दुर्गा मातेसाठी बनवले जाणारे गोडधोड पदार्थ. अनेकांसाठी देवीचा नैवेद्य बनवणं हा सणाचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण, तासनतास किचनमध्ये उभं राहणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. तुम्हीही रोजच्या पूजेनंतर लगेच बनवता येईल अशी एखादी सोपी रेसिपी शोधत असाल, तर हे इन्स्टंट कोकोनट लाडू नक्की ट्राय करून पाहा.

हे लाडू बनवण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट (सुखं खोबरं), दूध, मिल्क पावडर, साखर, वेलची आणि तूप लागतं. यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. अवघ्या १० मिनिटांत हे मऊ आणि चविष्ट लाडू तयार होतात. नवरात्रीच्या गोड पदार्थांच्या लिस्टमध्ये तुम्ही याचा नक्कीच समावेश करू शकता.

इन्स्टंट कोकोनट लाडूची रेसिपी

इन्स्टाग्रामवर @bingehousebysakshi या पेजवरून कंटेंट क्रिएटर साक्षी दर्डा हिने या सोप्या कोकोनट लाडूंची रेसिपी शेअर केली आहे. ही रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

View post on Instagram
 

कोकोनट लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

हे झटपट लाडू बनवण्यासाठी खालील साहित्य लागेल:

  • २ कप डेसिकेटेड कोकोनट (सुखं खोबरं)
  • १ कप दूध
  • १/४ कप मिल्क पावडर
  • १/२ कप साखर
  • १/४ चमचा वेलची पावडर
  • १-२ चमचे तूप
  • सजावटीसाठी खाण्यायोग्य चांदीचा वर्ख (ऐच्छिक)

हा गोड पदार्थ बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरात सहज उपलब्ध असते.

कोकोनट लाडू बनवण्याची कृती

स्टेप १: खोबरं भाजून घ्या

हे चविष्ट लाडू बनवण्यासाठी एका पॅनमध्ये थोडं तूप घ्या आणि मंद आचेवर गरम करा. त्यात डेसिकेटेड कोकोनट घाला आणि काही मिनिटे हलके परतून घ्या. गॅसची आच मंदच ठेवा जेणेकरून खोबरं करपणार नाही किंवा त्याचा रंग बदलणार नाही.

स्टेप २: मिल्क पावडर घाला

आता या खोबऱ्यात मिल्क पावडर घाला आणि ती सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल याची काळजी घ्या.

स्टेप ३: दूध घाला

यात दूध ओता आणि सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत सतत ढवळत राहा.

स्टेप ४: साखर आणि वेलची घाला

या मिश्रणात साखर आणि वेलची पावडर घाला. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हे मिश्रण ढवळत राहा. आता हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल.

स्टेप ५: लाडू वळायला घ्या

यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थोडं थंड होऊ द्या. मिश्रण हाताला सोसवेल इतपत गरम असतानाच हाताला थोडं तूप लावून त्याचे गोल लाडू वळून घ्या.

स्टेप ६: खोबऱ्याचं कोटिंग करा

तयार झालेले लाडू उरलेल्या डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्या. तुम्हाला हवं असल्यास सजावटीसाठी या लाडूंवर चांदीचा वर्ख लावू शकता.

मऊ आणि चविष्ट लाडूंसाठी काही खास टिप्स

खोबरं भाजताना त्याचा रंग बदलेपर्यंत भाजू नका. हलक्या हाताने भाजल्यामुळे खोबऱ्याची मूळ चव टिकून राहते. जर मिश्रण खूपच मऊ वाटत असेल, तर तुम्ही ते मंद आचेवर सतत ढवळत आणखी थोडा वेळ परतू शकता. आणि जर मिश्रण खूप घट्ट झालं असेल, तर लाडू वळण्यापूर्वी ते थोडं थंड होऊ द्या.

नवरात्रीच्या नैवेद्यासाठी एक सोपी रेसिपी

सणासुदीच्या काळात घरच्या घरी एखादा गोड पदार्थ बनवण्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. पण लक्षात ठेवा, हे लाडू फक्त नैवेद्यासाठी आहेत, उपवासासाठी नाहीत. या रेसिपीमध्ये दूध आणि मिल्क पावडरचा वापर केला असल्यामुळे, प्रत्येक घरात हे उपवासाला चालतीलच असं नाही.

तुम्ही तुमच्या परंपरेनुसार नवरात्रीच्या उत्सवात किंवा देवीच्या नैवेद्यासाठी हे कोकोनट लाडू अगदी सहज बनवू शकता.