एका कॉफीची ऑर्डर द्यायची आणि तासनतास टेबल अडवून बसायचं, या वर्क फ्रॉम कॅफेच्या ट्रेंडवर आता कॅफे मालकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता कॅफेमध्ये बसून काम करण्यासाठी नवीन नियम लागू केले जात आहेत.
एका कॉफीवर किती वेळ कॅफेमध्ये बसून काम करता येईल? आता 'वर्क फ्रॉम कॅफे' कल्चरवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोरोनानंतर काम करण्याची पद्धत खूप बदलली आहे. वर्क फ्रॉम होमसोबतच 'वर्क फ्रॉम कॅफे'चा ट्रेंडही वाढला आहे. लॅपटॉप उघडायचा, कानात हेडफोन लावायचे आणि तासनतास कॅफेमध्ये बसून काम करायचं, अशी अनेकांची सवय झाली आहे. पण, एकाच कॉफीवर पूर्ण दिवस टेबल अडवून ठेवल्यामुळे आता कॅफे मालकांनी नियम बदलण्यास सुरुवात केली आहे.
कॉफी कॅफे कल्चर
कोलकाता, बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये हे चित्र खूप सामान्य आहे. सकाळी ११ वाजता एक कॅपुचिनो ऑर्डर करून काही लोक संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एकाच टेबलवर बसून मीटिंग्स आणि काम करत असतात. फ्रीलांसर्स, स्टार्टअपचे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये हा ट्रेंड जास्त आहे. यामुळे कॅफे भरलेला दिसतो पण व्यवसाय होत नाही. नवीन ग्राहकांना बसायला जागा मिळत नाही. बऱ्याचदा असं दिसतं की चार जणांच्या टेबलवर एकच व्यक्ती लॅपटॉप घेऊन बसलेली असते. मोफत वाय-फाय, एसी, छान वातावरण आणि चार्जिंग पॉईंट वापरले जातात, पण कॅफेची कमाई वाढत नाही. याचा सर्वात मोठा फटका छोट्या आणि स्वतंत्र कॅफे मालकांना बसत आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक कॅफे आता त्यांच्या नियमांमध्ये मोठे बदल करत आहेत. काही ठिकाणी पीक अवर्समध्ये म्हणजेच दुपारी १२ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत लॅपटॉप वापरण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तर काही ठिकाणी दर दोन तासांनी किमान एक ऑर्डर देण्याचा नियम केला आहे. काही कॅफेंनी तर स्पष्ट नोटीस लावली आहे की एका तासापेक्षा जास्त वेळ बसायचं असेल तर किमान ३०० ते ५०० रुपयांची ऑर्डर द्यावीच लागेल. अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम कॅफेसाठी वेगळा चार्जेबल झोन किंवा को-वर्किंग टेबल तयार केले जात आहेत, जिथे तासाप्रमाणे पैसे द्यावे लागतील. सोशल मीडियावरही यावरून सध्या दोन गटांत वाद सुरू आहेत.
कॅफे मालकांचं म्हणणं आहे की त्यांचा वर्क फ्रॉम कॅफेला विरोध नाही, पण त्यात एक समतोल असायला हवा. कॅफे म्हणजे काही मोफत ऑफिस नाही. त्यांनाही भाडं, कर्मचाऱ्यांचे पगार आणि विजेचं बिल भरावं लागतं. जर एका ग्राहकाने तासनतास टेबल अडवून ठेवलं, तर त्यांच्या व्यवसायाचं नुकसान होतं आणि इतर ग्राहकांना सेवा देण्यात अडचण येते. त्यामुळे शिष्टाचार पाळून काम करणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला कॅफेमध्ये बसून काम करायचं असेल तर काही साधे नियम पाळले पाहिजेत. जसं की, गर्दीच्या वेळी टेबल अडवू नये, दर तासाला काहीतरी ऑर्डर करावं, हेडफोनवर मोठ्याने बोलू नये आणि कॅफे रिकामा असेल तरच लॅपटॉप उघडावा. एका कॉफीवर संपूर्ण दिवस काढण्याची मानसिकता आता बदलणं गरजेचं आहे.
















