मिलीबग म्हणजे झाडांवरील पांढरी कीड झाडाचा रस शोषून घेऊन नुकसान करते. पण स्वयंपाकघरातील साध्या व्हिनेगरच्या मदतीने केमिकलशिवाय या किडीला सहज संपवता येते. योग्य पद्धतीने व्हिनेगरचा स्प्रे बनवून झाडांचं संरक्षण करता येतं.
बागेची आवड असणाऱ्यांसाठी मिलीबग (पानांवर चिकटलेली पांढरी कीड) ही एक मोठी डोकेदुखी असते. पानं आणि फांद्यांच्या खालच्या बाजूला चिकटलेली ही कीड झाडाचा रस शोषून घेते आणि झाड सुकवून टाकते. पण कोणतंही केमिकल न वापरता, फक्त स्वयंपाकघरातील एका साध्या वस्तूच्या मदतीने तुम्ही या किडीला सहज संपवू शकता.
ही वस्तू कोणती आहे माहितीये?
ही वस्तू म्हणजे व्हिनेगर. मिलीबगच्या अंगावर साधारणपणे मेणासारखं एक आवरण असतं. त्यामुळे नुसतं पाणी ओतलं तरी ते मरत नाहीत. पण व्हिनेगरमध्ये असलेल्या अॅसिटिक अॅसिडमुळे ते मेणाचं आवरण वितळतं आणि कीड लगेच मरून जाते.
कसा बनवाल हा स्प्रे?
व्हिनेगरचा स्प्रे बनवणं खूप सोपं आहे. १ लिटर पाण्यात २ चमचे पांढरं व्हिनेगर (व्हाइट व्हिनेगर) मिसळा. त्यात १ चमचा लिक्विड सोप टाकून नीट ढवळून घ्या. साबणामुळे व्हिनेगर पानांवर आणि किडीच्या अंगावर चांगल्या प्रकारे चिकटून राहतं. हा स्प्रे बनवायला फक्त १० मिनिटं लागतात.
कुठे आणि कसा स्प्रे कराल?
स्प्रे तयार झाल्यावर झाडाच्या काही पानांवर फवारणी करा आणि २४ तास निरीक्षण करा. जर पानं तपकिरी रंगाची झाली नाहीत, तर तुम्ही हा स्प्रे पूर्ण झाडावर वापरू शकता. झाडाची पानं, फांद्या आणि कळ्यांच्या खालच्या बाजूला जिथे मिलीबग जास्त प्रमाणात असतात, तिथे हा स्प्रे व्यवस्थित मारून घ्या.
हे कसं काम करतं?
व्हिनेगरमधील अॅसिटिक अॅसिड पांढऱ्या किडीच्या अंगावरील चिकट मेणासारखं आवरण वितळवून किडीला नष्ट करतं. व्हिनेगर कधीही थेट झाडावर स्प्रे करू नये. १ भाग व्हिनेगरमध्ये ३ भाग पाणी (उदा. १ कप व्हिनेगरमध्ये ३ कप पाणी) मिसळून स्प्रे करावा. किंवा कापसाचा बोळा व्हिनेगरमध्ये बुडवून तो फक्त किडींवर लावू शकता. व्हिनेगर अॅसिडिक असल्याने, त्याचं प्रमाण जास्त झालं किंवा कडक उन्हात फवारणी केली, तर झाडाची पानं जळण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण झाडावर फवारणी करण्याआधी एका पानावर प्रयोग करून पाहणं केव्हाही चांगलं.
















