घरी बनवलेलं लोणचं लवकर खराब होऊ नये आणि वर्षभर टिकावं असं वाटतंय? मग बरणीची स्वच्छता, ओलावा, मिठाचं प्रमाण आणि साठवणुकीच्या पद्धतीकडे लक्ष द्या. लोणचं सुरक्षित ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा.
मुंबई : हिवाळ्यात घरी बनवलेलं लोणचं जेवणाची चव वाढवतं. तिखट, आंबट, खारट आणि मसाल्यांनी भरलेलं लोणचं ताटात असेल, तर साधं जेवणही भारी लागतं. म्हणूनच अनेक घरांमध्ये हिवाळ्यात लोणचं बनवून ते वर्षभरासाठी साठवून ठेवलं जातं. पण लोणचं बनवणं जितकं सोपं आहे, तितकंच ते जास्त काळ टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. थोडासा जरी निष्काळजीपणा झाला, तरी लोणच्याची चव आणि रंग बदलू शकतो. फोडी मऊ पडू शकतात, खराब वास येऊ शकतो किंवा वरच्या बाजूला बुरशी लागू शकते.
लोणचं खराब होण्यापासून कसं वाचवायचं?
स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी बरणी वापरा
लोणचं खराब होऊ नये म्हणून सर्वात आधी बरणीच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. लोणचं ज्या बरणीत ठेवणार आहात, ती स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्या. बरणीचं झाकण आणि लोणचं काढण्यासाठी वापरला जाणारा चमचा यावर पाण्याचा एकही थेंब नसावा.
लोणच्याच्या साहित्यात ओलावा नसावा
लोणचं बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या किंवा फळे पूर्णपणे कोरडी असणं गरजेचं आहे. आंबा, लिंबू, मिरची किंवा इतर भाज्या धुतल्या धुतल्या लगेच मसाला किंवा तेलात मिसळू नका. त्यांच्यावर राहिलेला ओलावा लोणचं लवकर खराब करू शकतो. त्यामुळे पुढची कृती करण्याआधी ते व्यवस्थित सुकवून घ्या.
मीठ आणि आंबटपणाचं प्रमाण योग्य ठेवा
लोणचं सुरक्षित ठेवण्यात मीठ आणि आंबटपणाचा समतोल खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. मीठ फक्त चवच वाढवत नाही, तर फोडींमधला ओलावा बाहेर काढायला आणि लोणचं टिकवायला मदत करतं. त्यामुळे या गोष्टी योग्य प्रमाणात वापरा.
लोणचं पूर्णपणे तेलात बुडालेलं असावं
बरणीत लोणचं भरल्यानंतर त्यातल्या फोडी तेल किंवा वापरलेल्या द्रवात पूर्णपणे बुडाल्या आहेत की नाही, हे तपासून पाहा. वरच्या बाजूला उघड्या राहिलेल्या फोडी लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते.
लोणचं ऊन आणि उष्णतेपासून दूर ठेवा
तुम्ही लोणचं कुठे ठेवता, हेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बरणी थेट सूर्यप्रकाश किंवा जास्त उष्णता असलेल्या ठिकाणी ठेवू नका. गरम आणि जास्त प्रकाश असलेल्या जागी ठेवल्यास लोणच्याची चव, रंग आणि पोत लवकर बदलू शकतो.
लोणचं काढताना ओला चमचा वापरू नका
लोणचं काढतानाही काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडा चमचाच वापरा. ओला चमचा, खरकटा चमचा किंवा अन्नाचे कण असलेला चमचा थेट लोणच्याच्या बरणीत घालू नका. यामुळे लोणचं लगेच खराब होतं.
लोणचं खराब झाल्याची लक्षणं ओळखा
लोणचं वेळोवेळी तपासून पाहत राहा. नेहमीच्या आंबट वासाऐवजी जर विचित्र किंवा खराब वास येऊ लागला, त्याचा पोत खूप चिकट झाला, रंग अनैसर्गिकरीत्या बदलला किंवा वरच्या बाजूला बुरशी दिसली, तर ते खाणं सुरक्षित नाही हे समजून जा.








