रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं, हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? पोळी, डोसा खाऊन कंटाळा आला असेल, तर एकदा कोबीचा पराठा नक्की करून पाहा. घरात सहज उपलब्ध असलेल्या कोबी आणि गव्हाच्या पिठापासून तुम्ही हा चविष्ट पराठा बनवू शकता.
मुंबई : रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं, हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? पोळी, डोसा खाऊन कंटाळा आला असेल, तर एकदा कोबीचा पराठा नक्की करून पाहा. घरात सहज उपलब्ध असलेल्या कोबी आणि गव्हाच्या पिठापासून तुम्ही हा चविष्ट पराठा बनवू शकता. मसाल्यांचा खमंग सुगंध असलेला हा पराठा तुम्ही दही, लोणचं किंवा चटणीसोबत खाऊ शकता. चला तर मग, कोबीचा पराठा बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.
कोबीचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
सारणासाठी (मसाला):
- किसलेला कोबी – २ कप
- धणे – २ चमचे (टीस्पून)
- जिरे – १ चमचा (टीस्पून)
- सुक्या लाल मिरच्या – ४
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – २ चमचे (टीस्पून)
- बारीक चिरलेलं आलं – १ चमचा (टीस्पून)
- कोथिंबीर – थोडीशी
- गरम मसाला – १ चमचा (टीस्पून)
- मीठ – चवीनुसार
पराठ्याच्या पिठासाठी:
- गव्हाचं पीठ – २ कप
- ओवा – १/४ चमचा (टीस्पून)
- मीठ – चवीनुसार
- रवा – २ मोठे चमचे (टेबलस्पून)
- पाणी – गरजेनुसार
- तूप किंवा तेल – भाजण्यासाठी
कोबीचा पराठा बनवण्याची कृती
पहिली पायरी: सारण तयार करा
सगळ्यात आधी कोबी स्वच्छ धुवून किसून घ्या. धणे आणि जिरे भाजून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर एका भांड्यात किसलेला कोबी, धणे-जिरे पावडर, सुक्या लाल मिरचीचे तुकडे, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, गरम मसाला आणि मीठ एकत्र करून मिश्रण चांगलं एकजीव करा.
दुसरी पायरी: पीठ मळून घ्या
एका दुसऱ्या भांड्यात गव्हाचं पीठ, रवा, ओवा आणि थोडं मीठ एकत्र करा. गरजेनुसार पाणी घालत पीठ मऊ मळून घ्या. मळलेलं पीठ झाकून ठेवा आणि साधारण १५-२० मिनिटे तसंच राहू द्या.
तिसरी पायरी: पराठा लाटून घ्या
पिठाचे छोटे गोळे तयार करा. एक गोळा थोडासा लाटून घ्या आणि त्याच्या मध्यभागी तयार केलेलं कोबीचं सारण भरा. कडा एकत्र करून गोळा बंद करा आणि हलक्या हाताने लाटण्याने पराठा लाटून घ्या. लाटताना पीठ फाटणार नाही, याची काळजी घ्या.
चौथी पायरी: पराठा भाजून घ्या
गरम तव्यावर लाटलेला पराठा टाका. मध्यम आचेवर दोन्ही बाजू चांगल्या भाजून घ्या. त्यानंतर थोडं तूप किंवा तेल लावून पराठा सोनेरी रंगाचा होईपर्यंत खरपूस भाजा.
पाचवी पायरी: गरमागरम सर्व्ह करा
पराठा चांगला भाजला की तव्यावरून काढा आणि गरमागरम सर्व्ह करा. यासोबत दही, लोणचं किंवा तुमची आवडती चटणी दिल्यास याची चव आणखी वाढेल.
पराठा अधिक चविष्ट होण्यासाठी या टिप्स फॉलो करा
- कोबी किसल्यानंतर त्यात जास्त पाणी असेल, तर ते पिळून काढा. यामुळे सारण पातळ होणार नाही.
- सारण बनवताना मीठ जपून घाला; कारण मीठ घातल्यावर कोबीला पाणी सुटण्याची शक्यता असते.
- पराठा लाटताना त्यावर जास्त दाब देऊ नका.
- मध्यम आचेवर भाजल्यास पराठा आतूनही चांगला शिजतो.
- तुम्हाला कुरकुरीत पराठा हवा असेल, तर थोडं जास्त तूप किंवा तेल वापरा.







