हॉटेलमध्ये मिळणारी मऊ आणि पातळ रुमाली रोटी आता तुम्ही घरच्या साध्या लोखंडी तव्यावरही बनवू शकता. पीठ मळण्याची योग्य पद्धत, दूध आणि तेलाचा वापर, तसेच रोटी भाजण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या आणि घरच्या घरी चविष्ट रुमाली रोटीचा आस्वाद घ्या!

मुंबई : तुम्हालाही रुमाली रोटी खायला आवडते का? पण सध्या नवरात्रीचे दिवस सुरू असल्याने हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची इच्छा नाहीये? अशा वेळी तुम्ही घरच्या साध्या लोखंडी तव्यावरच रुमाली रोटी बनवू शकता. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंय! काही सोप्या पद्धती आणि किचन टिप्स वापरल्या, तर घरच्या तव्यावरही हॉटेलसारखी मऊ आणि पातळ रुमाली रोटी तयार करता येते. चला तर मग, ही सोपी रेसिपी जाणून घेऊया.

रुमाली रोटी मऊ राहण्यासाठी हे आहे सिक्रेट!

मैदा आणि गव्हाच्या पिठाचे योग्य प्रमाण

सर्वांत आधी एक कप मैदा घ्या. त्यात अर्धा कप गव्हाचे पीठ घालून चांगलं मिक्स करा. फक्त मैदा वापरला तर रोटी जास्त ताणली जात नाही. त्यामुळे थोडं गव्हाचं पीठ मिसळणं फायद्याचं ठरतं.

दूध आणि तेलाचा वापर

आता या पिठात चिमूटभर मीठ, एक चमचा तेल आणि अर्धा कप कोमट दूध घाला. दूध घातल्यामुळे रोटी थंड झाल्यावरही मऊ राहण्यास मदत होते.

पीठ मळण्याची योग्य पद्धत

थोडं-थोडं पाणी घालत पीठ अगदी मऊ मळून घ्या. पीठ जितकं मऊ असेल, तितकी रोटी पातळ लाटता येईल. पीठ मळून झाल्यावर एका ओल्या कपड्याने झाकून साधारण १५ ते २० मिनिटे तसंच ठेवा. यामुळे पीठ चांगलं मुरतं आणि रोटी लाटायला सोपी जाते.

लोखंडी तवा तयार करण्याची सोपी ट्रिक

हॉटेलमध्ये रुमाली रोटी एका मोठ्या, उलटे ठेवलेल्या तव्यावर बनवली जाते. घरीही आपण हीच पद्धत वापरू शकतो. सर्वांत आधी तुमचा घरचा लोखंडी तवा उलटा करून गॅसवर ठेवा.

रोटी तव्याला चिकटू नये म्हणून एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात एक चमचा मीठ विरघळवून घ्या. तवा गरम झाल्यावर या मिठाच्या पाण्याचा थोडा शिडकावा करा.

रुमाली रोटी कशी लाटायची आणि भाजायची?

  • पिठाचे छोटे-छोटे गोळे तयार करा. त्यानंतर सुका मैदा लावून रोटी शक्य तितकी पातळ लाटून घ्या. रोटी इतकी पातळ असावी की त्याखालून तुमची बोटं दिसली पाहिजेत.
  • हवं असल्यास लाटलेली रोटी दोन्ही हातांवर हलक्या हाताने फिरवत थोडी मोठी करू शकता. पण ती फाटणार नाही याची काळजी घ्या.
  • आता ही लाटलेली रोटी गरम झालेल्या उलट्या तव्यावर टाका.
  • रुमाली रोटी साधारणपणे मोठ्या आचेवर (हाय फ्लेम) भाजली जाते.
  • रोटीवर छोटे बुडबुडे दिसू लागताच ती पलटी करा. एका स्वच्छ सुती कपड्याने हलक्या हाताने दाबत, दुसरी बाजूही साधारण १०-१५ सेकंद भाजून घ्या.
  • रोटी जास्त वेळ तव्यावर ठेवली तर ती कडक होऊ शकते. त्यामुळे दोन्ही बाजू भाजल्या गेल्या की लगेच तव्यावरून काढा.

रुमाली रोटी सर्व्ह करण्याची पद्धत

  • रोटी भाजून झाल्यावर तव्यावरून काढा आणि रुमालासारखी घडी घाला. वरून थोडं बटर किंवा तूप लावा.
  • त्यानंतर रोटी हॉटपॉटमध्ये किंवा एका स्वच्छ सुती कपड्यात गुंडाळून ठेवा. यामुळे रोटीचा मऊपणा आणि गरमपणा तसाच टिकून राहील.