Maida Flour : मैदा नक्की कशापासून बनतो? गव्हाचे पीठ आणि मैद्यात काय फरक आहे?
गव्हाचे पीठ आणि मैदा हे दोन्ही गव्हापासूनच तयार होतात. मग गव्हाचे पीठ आरोग्यासाठी चांगले आणि मैदा वाईट का मानला जातो? या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे?

तुम्हीही मैद्याचे पदार्थ खाताय का?
आपण रोज खात असलेले अनेक पदार्थ मैद्यापासून बनवलेले असतात. बेकरीतील केक, कुरकुरीत समोसे, नान, बिस्किटे हे सगळं मैद्यापासूनच तयार होतं. खरं सांगायचं तर, मैद्यामुळेच या पदार्थांना छान चव येते. पण आरोग्याचा विचार केला तर मैदा खाऊ नये असा सल्ला दिला जातो. पण मैदा का खाऊ नये? तो नक्की कशापासून बनतो?

मैदा कसा तयार होतो?
आपण रोज वापरतो त्याच गव्हापासून मैदा तयार होतो. पण त्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. सर्वात आधी गहू स्वच्छ करून त्यातील माती आणि धूळ काढतात. त्यानंतर रोलर मिलमध्ये गहू दळून त्यातील कोंडा (bran), जंतू (germ) आणि एंडोस्पर्म (endosperm) वेगळे करतात. यातील फक्त पांढरा भाग (एंडोस्पर्म) अनेक वेळा चाळून अतिशय बारीक मैदा तयार करतात. हा मैदा थोडा पिवळसर असतो. त्याला पांढराशुभ्र आणि आकर्षक बनवण्यासाठी बेंझॉयल पेरॉक्साइड (benzoyl peroxide) किंवा क्लोरीन डायऑक्साइड (chlorine dioxide) सारख्या रसायनांचा वापर करून ब्लीच करतात.
मैदा का खाऊ नये?
मैदा आरोग्यासाठी चांगला नाही असं सगळेच सांगतात. कारण या पिठात फायबर अजिबात नसतं. मैदा बनवताना गव्हाचा सगळा कोंडा काढून टाकतात. त्यामुळे मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट फुगण्याचा त्रास होतो. शिवाय, मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. तो खाल्ल्यावर लगेच त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत. मैदा रिफाइंड करताना त्यातील सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होतात. त्यात फक्त कार्बोहायड्रेट्स उरतात. यामुळे शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही. मैद्याचे पदार्थ खाल्ल्यावर शरीराला तात्काळ ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात थकवा जाणवतो. पुन्हा गोड खाण्याची इच्छा होते आणि जंक फूड खाण्याची सवय लागते. यामुळे वजन वेगाने वाढतं. याशिवाय मैदा बनवताना वापरलेली रसायने आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम करतात आणि अनेक आजारांना निमंत्रण देतात.
मग मैदा पूर्णपणे बंद करावा का?
सणासुदीला किंवा कधीतरी बेकरीचे पदार्थ खाल्ल्याने फारसं नुकसान होत नाही. पण रोज मैद्याचा ब्रेड, पिझ्झा, पास्ता आणि बिस्किटे खाणे ही खरी समस्या आहे. मैद्याऐवजी गव्हाचे पीठ, ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा बेसनाचा वापर केल्यास तुम्ही निरोगी राहाल.
मैदा म्हणजे शरीरासाठी पूर्णपणे विष नसले तरी तो आरोग्यासाठी चांगला नक्कीच नाही. तो पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणेच आरोग्यासाठी हिताचे आहे.








