हिरो मोटोकॉर्पने आपली लोकप्रिय कम्युटर बाईक, हिरो एचएफ डिलक्स कॅनव्हास ब्लॅक एडिशनची किंमत 7,635 रुपयांनी कमी केली आहे. यामुळे आता बाईकची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये झाली आहे.

चांगले मायलेज देणारी आणि खिशाला परवडणारी एक विश्वासार्ह बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. देशातील आघाडीची दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपली लोकप्रिय कम्युटर बाईक हिरो एचएफ डिलक्स कॅनव्हास ब्लॅक एडिशनची (Hero HF Deluxe Canvas Black Edition) किंमत कमी केली आहे. कंपनीने या मॉडेलवर तब्बल 7,635 रुपयांची मोठी सूट जाहीर केली आहे. यामुळे बाईकची सुरुवातीची किंमत आता 59,999 रुपये झाली आहे. याआधी या बाईकची किंमत 67,634 रुपये होती.

हिरो एचएफ डिलक्स कॅनव्हास ब्लॅक एडिशन जून 2023 मध्ये बाजारात आली होती. त्यावेळी या बाईकची किंमत 60,760 रुपये होती. त्यानंतर अनेक टप्प्यांमध्ये किंमत वाढवून 67,634 रुपयांपर्यंत पोहोचली होती. विशेष म्हणजे, आताची किंमत ही बाईक लाँच झाली त्यावेळच्या किमतीपेक्षाही कमी आहे.

मात्र, ही किंमत कपात देशभरात लागू नाही. सध्या फक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमधील ग्राहकांनाच या नव्या किमतीचा फायदा घेता येणार आहे. इतर राज्यांमध्ये ही ऑफर कधी लागू होईल, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

97.2 सीसी इंजिन आणि 70 किलोमीटर मायलेज

हिरो एचएफ डिलक्समध्ये पूर्वीप्रमाणेच 97.2 सीसी क्षमतेचं, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 7.8 पीएस पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क निर्माण करतं. 4-स्पीड गिअरबॉक्स असलेल्या या बाईकची कामगिरी रोजच्या वापरासाठी अगदी योग्य आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 70 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते.

या बाईकमध्ये मजबूत ट्युबुलर डबल क्रॅडल फ्रेम, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, ड्युअल रिअर शॉक ॲबसॉर्बर्स आणि दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. खराब रस्त्यांवरही चांगला प्रवास अनुभव मिळावा, यासाठी सस्पेन्शन सिस्टीम तयार करण्यात आली आहे.

या सेगमेंटमध्ये आहे मोठी स्पर्धा

एचएफ डिलक्सची किंमत कमी करण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे हिरो मोटोकॉर्पने अधिकृतपणे सांगितलेलं नाही. पण एंट्री-लेव्हल कम्युटर बाईक सेगमेंटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचं बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे. सध्या या सेगमेंटमध्ये होंडा शाईन 100 (Honda Shine 100), बजाज प्लॅटिना 100 (Bajaj Platina 100) आणि टीव्हीएस स्पोर्ट (TVS Sport) यांसारख्या मॉडेल्सची मोठी स्पर्धा आहे. कमी किंमत आणि उत्तम मायलेजच्या जोरावर अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा हिरोचा प्रयत्न असल्याचं दिसतंय.

विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, हिरो एचएफ डिलक्स ही देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कम्युटर बाईक्सपैकी एक म्हणून ओळखली जाते.