आई होण्याचा विचार करताय? मग प्रेग्नन्सीआधी काही महत्त्वाच्या टेस्ट्स करणं गरजेचं आहे. पिरेड्समधला त्रास, रक्ताची कमतरता, अनियमित ब्लीडिंग आणि वारंवार होणारा युरिन इन्फेक्शनचा त्रास अजिबात अंगावर काढू नका. याबद्दल डॉक्टरांचा सल्ला नक्की वाचा.

मुंबई : महिला अनेकदा आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. पिरेड्सच्या वेळी होणाऱ्या वेदना, अनियमित ब्लीडिंग, वारंवार होणारा युरिन इन्फेक्शनचा त्रास आणि सतत जाणवणारा थकवा ही एखाद्या मोठ्या आजाराची लक्षणं असू शकतात.

आई होण्याचा विचार करताय?

बऱ्याचदा लहान वयात सुरू झालेल्या या समस्या अनेक वर्षांनंतर समोर येतात. त्यामुळे वेळीच लक्षणं ओळखून योग्य त्या टेस्ट्स करणं खूप महत्त्वाचं आहे. याबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.

पिरेड्सच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका

महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइड्स आणि एडेनोमायोसिस यांसारख्या समस्या अगदी लहान वयातही दिसू शकतात. पिरेड्स वेळेवर न येणं, पोटात खूप दुखणं, शारीरिक संबंध ठेवताना वेदना होणं आणि असामान्य ब्लीडिंग ही या आजारांची मुख्य लक्षणं आहेत. जर पिरेड्सच्या त्रासामुळे तुम्हाला रोजची कामं करणं कठीण जात असेल किंवा अंथरुणातून उठणंही शक्य नसेल, तर याला सामान्य त्रास समजण्याची चूक करू नका. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

अॅनिमियाचा धोका ओळखा

देशातील सुमारे ५७ टक्के महिला अॅनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेने त्रस्त आहेत. पण, अनेक महिलांना आपला थकवा आणि अशक्तपणा यामागे रक्ताची कमतरता हे कारण असल्याचं माहीतच नसतं. प्रेग्नन्सीमध्ये रक्ताची कमतरता असेल तर बाळाचं वजन कमी भरणं, डिलिव्हरीनंतर जास्त ब्लीडिंग होणं आणि बाळाला पुरेसा रक्तपुरवठा न होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आईलाही सतत थकवा जाणवू शकतो. रक्ताच्या कमतरतेमुळे स्त्रीबीजांच्या वाढीवरही परिणाम होतो, ज्यामुळे पिरेड्स अनियमित होऊ शकतात.

ताणतणाव आणि अपुरी झोप

कामाचा ताण, रात्री उशिरापर्यंत जागणं आणि अपुरी झोप याचा थेट परिणाम महिलांच्या हार्मोन्सवर होतो. यामुळे स्त्रीबीजांच्या वाढीवरही वाईट परिणाम होतो. कॉर्पोरेट क्षेत्रात सलग अनेक तास बसून काम करणाऱ्या महिलांमध्ये अशा समस्या जास्त प्रमाणात दिसून येतात.

प्रेग्नन्सीआधी या ६ टेस्ट्स नक्की करा

ज्या महिला आई होण्याचा विचार करत आहेत, त्यांनी किमान तीन महिने आधी काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या करून घेणं आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. या टेस्ट्स खालीलप्रमाणे आहेत -

  • सीबीसी (CBC - Complete Blood Count) टेस्ट
  • हिमोग्लोबिन टेस्ट
  • थॅलेसेमिया टेस्ट
  • थायरॉईड टेस्ट
  • ब्लड शुगर टेस्ट
  • रुबेला टेस्ट

यासोबतच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज ४०० मायक्रोग्रॅम फॉलिक अॅसिड घेणं फायद्याचं ठरतं. यामुळे बाळाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याशी संबंधित 'न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स'चा धोका कमी होण्यास मदत होते. प्रेग्नन्सीआधी संतुलित आहार घेणं आणि रोज व्यायाम करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

वारंवार युरिन इन्फेक्शन होत असेल तर सावधान

महिलांमध्ये वारंवार युरिन इन्फेक्शन (UTI) होण्याची अनेक कारणं असू शकतात. पाणी कमी पिणं, डायबिटीस, किडनी किंवा मूत्राशयात खडे असणं आणि मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होणं ही यामागची मुख्य कारणं आहेत. शारीरिक संबंधांनंतर होणाऱ्या युरिन इन्फेक्शनला 'हनिमून सिस्टायटिस' असं म्हणतात. जर वर्षभरात तीन वेळा किंवा सहा महिन्यांत दोन वेळा इन्फेक्शन झालं, तर त्याला 'रिकरंट यूटीआय' (Recurrent UTI) मानलं जातं. या समस्येपासून दूर राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं. शारीरिक संबंधांनंतर लघवीला जाणं आवश्यक आहे. तसेच, खाजगी अवयवांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.