Epilepsy Emergency Tips : रस्त्यात एखाद्याला अचनाक फीट आल्यानंतर काय करावे हे काहीजणांना माहिती असते. अशावेळी डॉक्टर जवळ नसल्यास सर्वप्रथम काय करावे याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घ्या. 

Epilepsy Emergency Tips : फीट किंवा आकडी येणे ही अत्यंत गंभीर परिस्थिती असते आणि ती कोणालाही, कोणत्याही वेळी येऊ शकते. विशेषत: रस्त्यात अचानक अशी अवस्था पाहिल्यास सामान्य व्यक्ती घाबरून जाते, काय करावे हे समजत नाही. परंतु योग्य वेळी योग्य मदत मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात आणि गंभीर दुखापत टाळता येते. त्यामुळे फीट येणाऱ्या व्यक्तीला तातडीने कशी मदत करावी, काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सर्वात आधी सुरक्षित जागा निर्माण करा

एखाद्या व्यक्तीला रस्त्यात किंवा फुटपाथवर अचानक फीट आली तर लगेचच त्याच्या आसपासची जागा सुरक्षित करणे महत्त्वाचे. त्याच्या जवळील धारदार, टोकदार, कठीण वस्तू दूर करा. वाहतूक सुरू असेल तर रस्त्यावर थांबलेली माणसे किंवा गाड्यांना मागे हटवून त्या व्यक्तीभोवती सुरक्षित वर्तुळ तयार करा. फीट येताना शरीर अनैच्छिक हालचाली करते, त्यामुळे जागा मोकळी केल्याने दुखापत टाळता येते.

 व्यक्तीला जबरदस्ती पकडू नका

फीट आल्यावर अनेक जण त्या व्यक्तीला दाबून थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण हे चुकीचे आहे. शरीराला दाबल्याने हाडे-मांस दुखापत होऊ शकते. व्यक्तीला सपाट जमिनीवर एका बाजूला हलकेच झोपवा, परंतु त्याच्या हातापायांना दाबू नका. त्याच्या डोक्याखाली बॅग, रुमाल किंवा मऊ वस्तू ठेवा, जेणेकरून डोक्याला धक्का बसणार नाही.

तोंडात काहीही घालू नका

लोकांच्या मनात असणाऱ्या सर्वात धोकादायक गैरसमजांपैकी एक म्हणजे – फीट आलेल्या व्यक्तीच्या तोंडात पाणी, चमचा, कापड किंवा बोटं घालावीत. हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि प्राणघातक ठरू शकते. फीटमध्ये दात घट्ट बसू शकतात; तोंडात काही घातल्यास श्वास रोखला जाऊ शकतो किंवा दात तुटून ते घशात अडकू शकतात. त्यामुळे तोंडाला काहीही लावू नका, फक्त airway स्वच्छ राहील याची खात्री करा.

फीट संपेपर्यंत व्यक्तीला शांत राहू द्या

बहुतेक फीट ३० सेकंद ते २ मिनिटांच्या आत थांबतात. त्या काळात त्या व्यक्तीजवळ राहणे, त्याला धीर देणे, डोळे-नाकावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. फीट थांबल्यावर व्यक्ती काही वेळ गोंधळलेली किंवा थकलेली असते. त्याला एका बाजूला ‘रिकव्हरी पोझिशन’मध्ये झोपवून श्वास व्यवस्थित आहे का ते तपासा. पाणी देण्याची घाई करू नका, तो पूर्ण शुद्धीवर आल्यावरच द्या.

कधी तातडीने रुग्णवाहिका बोलवावी?

सामान्य फीट २ मिनिटांच्या आत थांबते, परंतु खालील परिस्थितीत तातडीने १०८/एम्बुलन्स बोलवणे आवश्यक आहे:

• फीट ५ मिनिटांपेक्षा जास्त काळ चालू राहिल्यास

• श्वास घेण्यास त्रास दिसल्यास

• फीट थांबल्यावरही व्यक्ती शुद्धीवर न आल्यास

• गर्भवती महिला, लहान मूल किंवा वृद्ध व्यक्तीला फीट आल्यास

• फीटमध्ये गंभीर दुखापत, रक्तस्त्राव झाल्यास

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)