दिवाळीच्या आनंदात तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने 'सेव्हन कप बर्फी' बनवू शकता. फक्त ७ कप साहित्यापासून बनणारी ही मिठाई म्हैसूर पाकसारखीच तोंडात टाकताच विरघळते. योग्य प्रमाण आणि पद्धत वापरून नवशिकेही ही बर्फी सहज बनवू शकतात.

मुंबई : दिवाळीच्या सणात तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि भन्नाट चवीची 'सेव्हन कप बर्फी' (7 Cup Burfi) बनवू शकता. ही मिठाई म्हैसूर पाकसारखीच तोंडात टाकताच विरघळते. तुम्ही फक्त ७ कप साहित्यांचा वापर करून अगदी कमी वेळात ही बर्फी तयार करू शकता.

७ कप साहित्य कोणतं लागेल?

बेसन – १ कप

किसलेला नारळ (खोबरं) – १ कप

साखर – २ कप

दूध – १ कप (उकळून थंड केलेलं)

ड्रायफ्रुट्स पावडर (बदाम आणि काजू) – १ कप

तूप – १ कप

बनवण्याची सोपी पद्धत

  • तुम्ही सगळ्यात आधी कढईत २-३ चमचे तूप गरम करा. यात १ कप बेसन घालून मंद आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या, जेणेकरून त्याचा कच्चा वास निघून जाईल. त्यानंतर १ कप किसलेला नारळ घालून आणखी एक-दोन मिनिटे परता.
  • आता यात २ कप साखर आणि १ कप दूध घालून चांगलं मिक्स करा. साखर विरघळल्यावर बदाम-काजूची पावडर आणि चिमूटभर मीठ घालून सतत ढवळत राहा.
  • तुम्ही उरलेलं तूप एकदम ओतू नका. ३-४ वेळा थोडं-थोडं तूप घालत मिश्रण ढवळत राहा. अगदी शेवटी वेलची पावडर घाला.
  • १० ते १५ मिनिटांत मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल. तूप सुटून बुडबुडे येतील आणि मिश्रण कढई सोडू लागेल. हाच बर्फीचा योग्य पाक आहे.
  • लगेचच तूप लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये हे मिश्रण ओतून एकसारखं पसरवा. वरून सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स पेरा. थोडं थंड झाल्यावर तुमच्या आवडीनुसार चौकोनी आकारात कापून घ्या. तुमची मस्त ७ कप बर्फी तयार आहे.

नवशिकेही ही मिठाई कमी मेहनतीत आणि कोणत्याही झंझटीशिवाय सहज बनवू शकतात. यंदाच्या दिवाळीसाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे.

या गोष्टी नक्की लक्षात ठेवा...

  • तुम्ही सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच कप किंवा वाटीचा वापर करा. यामुळे प्रमाण आणि पाक अजिबात चुकणार नाही.
  • बेसन नेहमी मंद आचेवरच २-३ मिनिटे भाजा. बेसन करपणार नाही याची काळजी घ्या. कच्चा वास जाऊन खमंग वास आला की पुरे.
  • या रेसिपीसाठी पूर्ण १ कप तूप लागतंच. तूप कमी घातलं तर बर्फी मऊ होणार नाही, उलट कडक होईल. आणि तूप एकदम न घालता ३-४ वेळा थोडं-थोडं करून मिक्स करा.
  • ताटात ओतल्या ओतल्या लगेच कापू नका. वाफ थोडी कमी झाली आणि मिश्रण कोमट असतानाच सुरीने वड्या पाडून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर कापायला गेलात तर बर्फीचे तुकडे पडू शकतात.